लिंगदेवमध्ये ‘हौशा’ बैलाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा कानवडे कुटुंबियांकडून डीजेवर मिरवणूक, प्रवचन आणि मिष्टान्न जेवण


नायक वृत्तसेवा, अकोले
लहान मुलं, राजकारणी, सेलिब्रिटी यांचे वाढदिवस साजरे होत असल्याचे आपण नेहमी पाहतो. पण अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे ‘हौशा’ नावाच्या बैलाचा बारावा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला आहे. डीजेवर मिरवणूक, लेझीम नृत्य, अश्व नृत्य, प्रवचन व मिष्टान्न जेवण असा सगळाच थाटमाट ठेवण्यात आलेला होता.

गेल्या आठ दिवसांपासून कानवडे कुटुंबियांनी हौशाचा वाढदिवस घालण्यासाठी जय्यत तयारी केली होती. पाहुण्यांना पत्रिका पाठविण्यापासून ते कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सर्वच सदस्यांनी अगदी मनापासून काम केले. त्यानुसार गुरुवारी (ता.5) दुपारी 3 ते 6 यावेळेत हौशाची डीजेच्या तालावर मिरवणूक काढली. जोडीला लेझीम नृत्य, अश्व नृत्य होते. त्यामुळे ग्रामस्थांसाठी हे खास आकर्षण ठरले. सायंकाळी सहा वाजता उज्ज्वला वाकळे यांचे प्रवचन झाले. आणि 7 वाजता केक कापल्यानंतर मिष्टान्न जेवण दिले. पुन्हा रात्री नऊ ते अकरा वाजता भजन असे विविध कार्यक्रम या आगळ्यावेगळ्या वाढदिवसानिमित्ताने झाले.

घरच्या गावठी गायीला गोठ्यात जन्माला आलेल्या या हौशाला त्यांनी घरातील सदस्याप्रमाणे वाढवलेलं आहे. त्र्यंबकेश्वर पायी दिंडीत जाणार्‍या रथाचा सारथी असणार्‍या हौशाने सलग आठ वर्ष पायी दिंडीत सारथ्य केले आहे. इतर वेळेत तो शेतात नांगरणीचे काम करतो. कुटुंबातील एक सदस्य असल्यागत सर्वजण त्याची देखभाल करतात म्हणून त्याचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करत असल्याचे दौलत कानवडे यांनी सांगितले. या वाढदिवसासाठी नामदेव मारुती कानवडे, मंगेश कानवडे, योगेश कानवडे आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 133 Today: 3 Total: 1108194

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *