डीजेचा ४५ डेसिबलच्या पुढे आवाज गेल्यास कारवाई! अकोलेचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला इशारा
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० ते ४५ डेसिबलच्या पुढे आवाज गेला की कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला आहे.
पंचवीस दिवसांपूर्वी अकोले पोलीस ठाण्याचा विजय करे यांनी पदभार घेतला. पंधरा दिवस तालुका समजून घेण्यात आणि तालुक्यातील पोलीस ठाण्याशी संबंधित व्यक्तींना तक्रार घेवून येणार्यांना कायदा कलम समजून सांगण्यात गेला. पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ पट्टाकिल्ला ते जायकवाडी असे विस्तृत विखुरलेले आहे. त्यात पोलीस बळ कमी, पंधरा कर्मचारी बदलून गेले आणि बदलून आलेले बारा कर्मचारी अद्याप पोलीस ठाण्यात आलेले नाही. त्यात गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. दोन पोलीस उपनिरीक्षक आणि ४२ पोलीस कर्मचार्यांच्या बळावर पोलीस ठाण्याची धुरा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या खांद्यावर आहे.
दरम्यान, काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अशातच पोलीस निरीक्षक करे यांनी पोलीस पाटील, नगरसेवक, शांतता समिती, गणपती मंडळे, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ३५ डीजे चालक-मालक, पत्रकार यांच्या बैठका घेवून संवाद साधला. या संवादात डीजेच्या आवाजाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. कोणताही कार्यक्रम असू द्या, त्यासाठी वाद्य परवानगी घ्या. मिरवणूक असेल तर डीजे कायद्याने बंद, पण अगदीच गरज म्हणून ४५ डेसिबलपर्यंत आवाजास हरकत नाही.
अनेकांना नोटिसा दिल्या. तरी देखील डीजे जोरात वाजल्याने धुमाळवाडी व चास येथील डीजे मालक व चालक यांचयावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. यामुळे डीजेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. डीजेवरील कारवाईचे डीजे मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन ढेकणे यांनी जाहीर स्वागतही केले आहे. दरम्यान, डीजे वाजवू द्या असा एका देश पातळीवरील वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता. पण त्यास पोलिसांनी दाद दिली नाही.