समर्थकांमध्ये सोशल माध्यमात रंगला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ! संगमनेरचे आमदार हल्ला प्रकरण; आरोपी चार दिवसांच्या पोलीस कोठडीत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवून तेथून माघारी निघत असताना गर्दीचा फायदा घेत एका माथेफिरुकडून आमदार अमोल खताळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेनंतर कार्यक्रमात गोंधळ उडण्यासह जमलेल्या लोकांनी हल्लेखोराला बेदम मारहाणही केली. काही दिवसांपूर्वी घुलेवाडीतील कीर्तन प्रकरणातून संगमनेरचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच सदरचा प्रकार घडल्याने शहरातील तणावातही मोठी वाढ झाली. हल्ला करणारा आरोपी जागीच जेरबंद झाल्यानंतर त्याची पार्श्‍वभूमी पडताळताना तो विरोधी गटाच्या समर्थकाचा मुलगा असल्याची गोष्ट समोर आली, त्यातून राजकारण रंगायला सुरुवात झालेली असतानाच विरोधकांकडूनही सोशल माध्यमातील काही छायाचित्रे पुढे करुन त्यावरुन वेगवेगळे तर्क लावण्यास सुरुवात झाली. दरम्यान पोलिसांनी आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि फौजदारी धाकदपटशा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याची चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे, त्याला कोणी चिथावणी दिली का?, कोणी त्याच्या संपर्कात होते का? घटनास्थळी तो एकटाच होता किंवा कसे? या प्रश्‍नांसह त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्‍लेषण होणार आहे, त्यातून वास्तवाचे दर्शन घडेलच. मात्र तत्पूर्वीच सोशल माध्यमात दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दावे-प्रतिदावे केले जात असून त्यातून संगमनेरचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.


गुरुवारी (ता.28) संगमनेरचे आमदार अमोल खताळ एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्रसाद गुंजाळ नामक माथेफिरु तरुणाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांच्या अंगरक्षकासह खासगी सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्याला जेरबंद करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर मालपाणी लॉन्सच्या परिसरात तरुणांचा मोठा जमाव गोळा होवून घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तापले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वारंवार कठोर कारवाईचे आश्‍वासन देवूनही संतप्त कार्यकर्ते मागे हटत नसल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीला बाहेर काढणेही अवघड झाले होते.


त्यातच जमावातील कोणीतरी आरोपीचे वडील विरोधीगटाकडून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी राहिल्याची बाब सांगत या हल्ल्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच आरोपी विद्यमान आमदारांना पुष्प देत असल्याचेही छायाचित्र सोशल माध्यमात फिरु लागले. त्यात काहींनी कोणताही पुरावा न जोडता आपल्या मनात आलेले वादाचे कारण जोडून अफवा सोडण्यास सुरुवात केली. अखेर अतिरीक्त फौजफाटा आल्यानंतर जमावाला पांगवण्यात आले आणि आरोपीला पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात नेवून त्याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न) आणि 351 (1) फौजदारी धाकदपटशा करुन आगळीक केल्याप्रकरणी काल पहाटे अडीच वाजता त्याला अटक करुन दुपारनंतर न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडीही मिळवली.


या चार दिवसांत आरोपी प्रसाद गुंजाळ कोणाच्या चिथावणीमुळे आक्रमक झाला होता?, त्याच्या कोणी संपर्कात होते का?, घटनास्थळावर तो एकटाच होता की त्याच्यासोबत अन्य कोणी? यासह ताब्यात घेतलेल्या त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्‍लेषण करुन या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होणार असल्याचे अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. एकीकडे आरोपीला अटक करुन त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असताना दुसरीकडे विरोधकांनीही या घटनेचा निषेध नोंदवून सत्ताधार्‍यांच्या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘माझे सहकारी..’ अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांचा उल्लेख करीत केलेले निषेधाचे ट्विट लक्षवेधी ठरले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे आणि शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे यांनीही अधिकृतपणे या घटनेचा निषेध नोंदवला.


या उपरांतही सोशल माध्यमात दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरुच असून त्यावरुन तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच या हल्ल्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चासमोर बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घडलेल्या प्रसंगाबाबत आपण किती गंभीर आहोत हे वारंवार स्पष्ट करताना हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवरही सक्तिने कारवाईचा इशाराही दिल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा अतिशय गांभीर्याने तपास सुरु आहे, त्यातून नेमके काय वास्तव समोर येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी त्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा निघाला होता. प्रशासकीय भवनासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर सगळ्याच वक्त्यांनी राजकीय धुमशान माजवले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढवून त्याच्या सखोल तपासाची गरज व्यक्त केली. यावेळी बोलताना या प्रकरणावरुन त्यांनी थेट पोलीस अधिकार्‍यांनाही जाहीर इशारा दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य शतपटीने वाढले असून आरोपीच्या चौकशीतून काय समोर येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Visits: 582 Today: 5 Total: 1098398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *