कोतूळच्या कांदा व्यापार्‍याची एक कोटीची फसवणूक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास ठोकल्या बेड्या


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोतूळ येथील कांदा व्यापार्‍याची सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. जयेश सन ऑफ गोपीनाथन (रा. त्रिशूर, केरळ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदा व्यापारी सीताराम काशिनाथ देशमुख (वय ५८) यांची १ कोटी ५३ हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी सन २०१७ मध्ये अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन शेख, अंमलदार अजय खोमणे, नियाज शेख यांनी गोपीनाथन याला अटक केली आहे.

सदरचा गुन्हा प्रोपा. पी. पी. एच. ट्रेडर्स, सी. एन. व्ही. मार्केट पालायाम (जि. कालीकेट, केरळ), प्रोप्रा. सी. ए. ब्रदर्स, (मार्केट रस्ता, थोडूपुंजा, केरळ), प्रोप्रा. अल्मास वनयण ट्रेडींग कंपनी (त्रिंमबावर, त्रिसूर, केरळ), जयेश सन ऑफ गोपीनाथन व अब्दुला (रा. टेंपलगेट, ता. तलासरी, जि. कन्नूर, केरळ) यांच्याविरोधात दाखल झालेला आहे. संशयित आरोपींनी कांदा व्यापारी देशमुख यांच्याकडून संगनमताने ६४ ट्रक कांदा विक्रीसाठी घेतला होता. या कांद्याच्या व्यवहारापोटी देणे असलेली १ कोटी ५३ हजारांची रक्कम देशमुख यांना न देता त्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान, फसवणूक झाल्यानंतर देशमुख यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने दिलेल्या सीआरपीसी कलम १५६(३) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनेकांना घातलाय गंडा..
अटक केलेला जयेश सन ऑफ गोपीनाथन याने इतर चौघांच्या मदतीने अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कांदा व्यापार्‍यांची फसवणूक केलेली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. तसेच संबंधित संशयित आरोपींविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Visits: 17 Today: 1 Total: 115935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *