दोन रुपयांवरुन वाहकाला मारहाण केल्याने तीन महिन्यांचा सश्रम कारावास! कर्जुले पठारचे तिघे तरुण दोषी; संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बस तिकिटाचे राहीलेले अवघे दोन रुपये देण्यावरुन बसवाहकाशी हुज्जत घालून नंतर आपल्या दोघा साथीदारांसह त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणार्या तिघांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. 2016 साली साकूर फाट्यावर घडलेल्या या घटनेत तिघांना दोषी धरुन संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि सातशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाने राज्यपरिवहन महामंडळाच्या बसचालक व वाहकांना दमबाजी करणार्यांना कठोर संदेशही गेला आहे.
याबाबतची हकिकत अशी की, 11 जून 2016 रोजी नेहमीप्रमाणे संगमनेर बसआगारातील चालक दत्तात्रय वामन हे आपले सहकारी वाहक किसन घुमरे यांच्यासह ‘संगमनेर ते साकूर’ (क्र.एम.एच.40/एन.8604) ही बस घेवून संगमनेरमधून निघाले. यावेळी वाहक घुमरे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची तिकिटे फाडीत असतांना संगमनेरपासून बसलेल्या एका तरुणाने साकूर फाट्याचे दोन तिकिटं मागून त्या बदल्यात वाहकाला 44 रुपये दिले. मात्र साकूर फाट्याचे त्यावेळचे तिकिटं 23 रुपये प्रत्येकी असल्याने वाहकाने राहिलेल्या दोन रुपयांची मागणी केली. त्यावरुन ‘त्या’ तरुणाने वाहकाची हुज्जत घालून नंतर फाट्यावर उतरताना देतो असे म्हणतं वेळ मारुन नेली.
दुपारी तीनच्या सुमारास सदरील बस साकूर फाट्यावर पोहोचली. यावेळी बसमधील प्रवाशी खाली उतरत असतांनाच दोन रुपये कमी देणार्या ‘त्या’ तरुणासह त्याचा सहप्रवाशी जोडीदार आणि फाट्यावर आलेल्या अन्य एका तरुणाने मिळून बसच्या वाहकाला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यातील मुख्य आरोपीने वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर अन्य दोघांनीही त्याचे अनुकरण केले. या गदारोळात त्या तिघांनी वाहकाकडील तिकिटाचे मशिनही फोडून टाकले व त्यांच्याकडील पैशांच्या बँगमधील तिकिटाची रक्कमही उधळून दिली, त्यात 893 रुपये गहाळ झाले.
या प्रकरणी वाहक किसन घुमरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 353, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासाला गती देत यातील मुख्य आरोपी सोमेश उर्फ सोमनाथ सुकदेव बोंबले, शुभम शुभम सुकदेव बोंबले व शुभम पांडूरंग गुंजाळ (तिघेही रा.कर्जुलेपठार) यांच्याविरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी जोरदार युक्तिवादासह पाच साक्षीदार तपासले.
सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्ष आणि फिर्यादीसह तपाशी अधिकार्यांनी दिलेला जवाब ग्राह्य धरुन न्यायालयाने वरील तिनही आरोपींना प्रत्येकी तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि सातशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून काही रक्कम फिर्यादी बस वाहकाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारी पक्षाचे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड काँन्स्टेबल प्रवीण डावरे, राजाभाऊ भुतांबरे, महिला पोलीस कर्मचारी दीपाली दवंगे, प्रतिभा थोरात, स्वाती नाईकवाडी, नयना पंडित यांनी काम पाहिले. या निकालाने शासकीय बस वाहक व चालकांना दमबाजी करणार्यांनाही चांगलाच संदेश गेला आहे.