पठारावरील कुरकुटवाडीच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू! पोलिसांना घातपाताचा संशय; मात्र बिबट्याने हल्ला केल्याचा भावाचा दावा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पडवीत झोपलेल्या दोघा भावांमधील एकावर मध्यरात्रीच्या अंधारात बिबट्याने झडप घातली आणि त्यात २२ वर्षीय तरुणाचा बळी गेला. जवळच झोपलेल्या त्याच्या मोठ्या भावाने आरडाओरड केल्यानंतर जमलेल्या आसपासच्या नागरिकांनी त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली, मात्र घारगाव पोलिसांना त्याची माहिती आज सकाळी प्राप्त झाल्यानंतर तपासाला गती आली. प्राथमिक तपासणीत पडवीच्या काही अंतरावर बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसून येतात, मात्र त्यांचा ठळकपणा डोळ्यात खूपणारा असून मयताच्या गळ्यावर केवळ एकच खोलवर जखम झाल्याने त्यातून झालेल्या मोठ्या रक्तस्रावाने त्याचा बळी गेला आहे. बिबट्यासारखे श्वापद शिकार करताना गळ्याचा घोट घेतात, मात्र या प्रकरणात तसा प्रकार दिसत नसल्याने पोलीस साशंक आहेत. मयत सचिन भानुदास कुरकुटे याचा मृत्यू पुणे जिल्ह्याच्या हद्दित जाहीर झाल्याने कायद्याने तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतरच मयत तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भानुदास विष्णू कुरकुटे हे आपली पत्नी संगीता व मुले हरीश (वय २४) व सचिन (वय २२) यांच्यासह पठारावरील कुरकुटवाडीत राहतात. सध्या ते आळंदी येथील एका रुग्णवाहिकेवर कार्यरत असल्याने तिकडेच वास्तव्यास आहेत. तर, त्यांचे उर्वरीत कुटुंब कुरकुटवाडीतच आहे. गुरुवारी (ता.२६) नेहमीप्रमाणे कुरकुटे कुटुंबाने रात्रीचे जेवण करुन आई संगीता घरात तर दोन्ही मुले पडवीत झोपी गेली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मोठा मुलगा हरीश मोठमोठ्याने आरडाओरड करु लागल्याने त्याच्या आईसह आसपास राहणारे नागरिक जागे होवून त्यांच्या घराकडे धावले.

यावेळी पडवीच्या टोकावर असलेल्या एका खाटावर सचिन कुरकुटे रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे सर्वांना दिसले. त्याबाबत विचारणा केली असता त्याच मोठा भाऊ हरीश याने बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले. आपण जागे होवून आरडाओरड केल्याने बिबट्या पळाल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यानुसार गळ्याला आणि कपाळावर झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने बेशुद्धावस्थेत असलेल्या सचिनला गावकर्‍यांच्या मदतीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमीचा मृत्यू झाल्याची गोष्ट पुणे जिल्ह्यातील रुग्णालयातून समोर आल्याने कायद्यानुसार त्याचा मृतदेह आळे ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात नेण्यात आला.

त्याच्या उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. सद्यस्थितीत पोलीस आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेत वस्तुस्थितीजन्य पुराव्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. प्राथमिक तपासात पडवीच्या भोवती बहुतेक लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. मयत तरुणाच्या गळ्याला झालेली एकमेव जखम बरीच खोल असल्याने त्यातून जागेवरच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. पडवीच्या बाहेरील बाजूला दोन ठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून येतात, मात्र त्यांचा ठसठशीतपणा डोळ्यांना खूपणारा असल्याने पोलीस सर्व शक्यता पडताळून बघत आहेत. वन विभागानेही सावध भूमिका घेत शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.

सदरचा प्रकार समोर येताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे, कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, प्रमोद गाडेकर यांच्यासह वन विभागाचे वनपाल हारुण सय्यद, वनरक्षक श्रीकिसन सातपुते आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यताही नाकारलेली नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वी अन्य शक्यताही पडताळून बघितल्या जात आहेत. पठारभागात बिबट्याने माणसावर हल्ला केल्याची घटना मोठ्या कालावधीनंतर समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *