… अखेर तिसर्या दिवशी परीक्षेचा गोंधळ मिटला
… अखेर तिसर्या दिवशी परीक्षेचा गोंधळ मिटला
नायक वृत्तसेवा, राहुरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेच्या तिसर्या दिवशी अखेर गोंधळ मिटला. वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका पोहोचून परीक्षा सुरळीतपणे पार पडली. यामुळे विद्यार्थ्यांनी एकच सुटकेचा निःश्वास सोडला.

पहिले दोन दिवस काही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पोहोचल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर महाविद्यालयात उपाशीपोटी बसून, परीक्षा न देता माघारी गेले. काही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका दोन ते चार तास उशिरा महाविद्यालयांना पोहोचल्या. त्यातही गोंधळ झाला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या. त्यामुळे घाबरलेल्या काही विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रश्नपत्रिका सोडवली नाही. दुसर्या दिवशी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका नाईलाजाने सोडविली. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला. तिसर्या दिवशी सर्व अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रकानुसार पोहोचल्या. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दडपण दूर झाले. परंतु, पहिले दोन दिवस उडालेल्या गोंधळामुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. तर, काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोडविल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

