म्हसवंडीसह आंबीदुमाला परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री फोडली आठ घरे; ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला केले पाचारण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील म्हसवंडी व आंबीदुमाला या दोन्ही गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घालत मंगळवारी (ता. 14) पहाटे आठ घरे फोडली असून मोठ्या प्रमाणात ऐवज चोरून नेला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले होते.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, रवींद्र उद्धव इथापे, बळीराम कारभारी बोडके, गुलाब गोविंद बोडके, अशोक कारभारी बोडके, बाळासाहेब कारभारी बोडके यांची घरे फोडून मोठा ऐवज चोरून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आंबीदुमाला येथील सुमन रंगनाथ जाधव यांच्याकडे वळवत दागिने चोरून नेले.
दरम्यान, दुसर्या दिवशी सकाळी घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस आधिकारी राहुल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, मुख्य हवालदार कैलास देशमुख, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर आदिंनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांनी फोडलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी घरातील सामानांची उचकापाचक करत कपडे फेकून दिली होती. त्यामुळे ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. वरील दोन्ही गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोड्या केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शांताराम रामू बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 285/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत हे करीत आहेत.