जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
बैल, गाय व मेंढी ठार; पशुपालकांचे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. बैल, गाय व मेंढीवर हल्ला करत ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये तिन्ही पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जांभुळवाडी परिसरातील कोळेकर वस्तीवर वास्तव्यास असणारे सखाराम आप्पा खेमनर यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.15) रात्री आपला खिलारी बैल घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्यात बांधला होता. परंतु, रात्रीच्या वेळेस अचानक बिबट्याने गोठ्यामध्ये प्रवेश करत बैलावर हल्ला चढवत ठार केले. सकाळी उठून खेमनर गोठ्याकडे गेले असता त्यांना बैल मृतावस्थेत दिसला. यामध्ये खेमनर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बैलावरील हल्ल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा बिरेवाडी परिसरात वळवला. तेथे धुमाकूळ घालत गोरक्षनाथ सागर यांची गाय तर शांताराम किसन ढेंबरे यांची मेंढी ठार केल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला समजताच वनरक्षक हनुमंता घुगे, बाळासाहेब फटांगरे आदिंनी तिन्ही घटनांचा पंचनामा केला आहे. दरम्यान यापूर्वीही बिबट्याने परिसरात परिसरात धुमाकूळ घालत मोठे नुकसान केले आहे. यावेळीही जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना वारंवार घडत आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये कमालिची भीती पसरली असून पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.