पोलीस उपअधीक्षकांची संगमनेर उपकारागृहात झाडाझडती! नवकैदी ‘खंडणी’ प्रकरण; ‘कमोड’ फोडूनही मोबाईल गवसण्यात अपयश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोखरी बाळेश्वर शिवारातील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात पोलीस कोठडीतील एका आरोपीच्या नातेवाईकाकडून बुधवारी रात्री खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक नायकने उजेडात आणला होता. यानंतर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पोलीस बंदोबस्तात चारही कोठड्यांची संपूर्ण झाडाझडती घेतली. मात्र ज्याचा वापर करुन खंडणी मागण्यात आली ‘तो’ मोबाईल संच गवसण्यात पोलिसांना अपयश आले. या कारवाईत पोलिसांनी संशयीत कैद्याच्या कोठडीतील टॉयलेटमधील ‘कमोड’ही फोडून काढला, मात्र त्या उपरांतही पोलिसांचे हात रिकामेच राहिले. यावरुन आरोपी किती सराईत आहेत याचा अंदाज येतो. वास्तविक या प्रकरणात संबंधित कैद्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. त्याच्या चौकशीतून कोठडीत असताना त्याने ‘त्या’ मोबाईलचा वापर करुन काय काय उद्योग केले याचा संपूर्ण लेखाजोखाच समोर येवू शकतो. मात्र पोलीस वर्तुळात अद्याप तशी कोणतीही हालचाल दिसत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
मंगळवारी (ता.6) पोखरी बाळेश्वर शिवारातील वेश्याव्यवसायावर घारगाव पोलिसांच्या पथकाने छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी चार मुलींची सुटका करण्यासह एका महिलेसह सहाजणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्या सर्वांना सोमवारपर्यंत (ता.12) पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्यासर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना उपकारागृहातील तीन वेगवेगळ्या बराकींमध्ये टाकले. त्यातील एका आरोपीच्या मावसभावाकडे मध्यरात्रीच्या सुमारास फोनवरुन ‘खंडणी’ मागण्यात आली.
विशेष म्हणजे सदरचा फोन बाहेरुन नव्हेतर चक्क संगमनेरच्या उपकारागृहातील कोठडीतून करण्यात आला होता. फोन करणाराही कैदीच होता आणि त्याच कोठडीत कैद होता. संबंधिताला ‘त्या’ कैद्याने फोन करुन पैशांची मागणी केली, तसे न केल्यास कोठडीत असलेल्या त्याच्या भावाला मारहाण करण्याची धमकीही देण्यात आली. आता अशा वेळी आपण कोठडीतूनच बोलतोय याचा भरवसा देण्यासाठी फोन करणार्या सराईताने मारहाण करुन त्याच्या भावाचा विव्हळण्याचा आवाज ऐकून दाखवला नसेल तर नवलच. सुसंस्कारीत कुटुंबातील हा तरुण वेश्यागमनासाठी गेलेल्या मित्राची केवळ सोबत करीत असल्याचेही समजते. मात्र छाप्याच्यावेळी तेथे हजर असणारे सगळेच त्याचा भाग मानला जात असल्याने सदरचा तरुण थेट गुन्हेगारी जगतात ‘खुखांर’ समजल्या जाणार्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींच्या कोठडीत पोहोचला.
त्यामुळे कोठडीतला आणि कोठडीबाहेरचा, ज्याला फोन करुन खंडणी मागितली गेली असे दोघेही घाबरले. काय करावे, काय नको त्यांना काहीच समजेना. याबाबत त्यांनी काही ठिकाणी आपली भीती व्यक्त केल्यानंतर सदरचा प्रकार दैनिक नायकला समजला. प्रकरणाची खातरजमा केल्यानंतर याबाबत गुरुवारी (ता.8) त्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्याची तत्काळ दखल घेत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिलांच्या कोठडीसह संपूर्ण कारागृहाची झाडाझडती घेतली. कोठडीतील प्रत्येक कोपरा आणि सापट तपासली गेली, मात्र हाती काहीच लागले नाही.
कोठडीतील कैद्याने मोबाईलवरुन खंडणी मागितली हे वास्तव असल्याने पोलिसांनी अखेर शेवटचा संशय म्हणून कोठडीतील टॉयलेटमध्ये असलेले कमोडही तपासले, त्यातही काही दिसत नाही असे वाटल्यानंतर संपूर्ण कमोडच फोडण्यात आले. मात्र त्यानंतरही पोलिसांचे हात रिकामेच राहिले. याप्रकरणात कोठडीतील कैदी पोलिसांपेक्षा सरस ठरले आणि त्यांनी खंडणीसाठी वापरलेला मोबाईल संच पद्धतशीर लंपास केला. खरेतर तो कोठेतरी तर असण्याची शक्यता कायम आहे. मात्र कोठे? याचे उत्तर फक्त फोन करणार्याकडेच आहे. कारण जो कोठडीत फोन वापरतो, नव्याने आलेल्या कैद्यांचा छळ करतो, त्यांच्या घरी खंडणीसाठी फोन करतो अशा आरोपीची कोठडीत काय दहशत असेल हे वेगळं सांगायला नको, त्यामुळे अन्य कैद्यांकडून माहिती मिळण्याचीही शक्यता कमीच आहे.
अशा स्थितीत पोलिसांनी संबंधित कैद्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्याची पोलीस कोठडी घेण्याची गरज आहे. आरोपीने मोबाईलवर फोन करुन पैशांची मागणी केली असल्याने त्याने ज्या क्रमांकाचा वापर केला त्याच्या सीडीआरमधून संपूर्ण लेखाजोखा समोर येवू शकतो. कारागृहात असतांना त्याने केलेले कारनामेही उघड होवू शकतात. याशिवाय खंडणीचा हा प्रकार समोर आला म्हणून प्रसिद्धीस मिळाला, या आरोपींकडून यापूर्वी असेकाही घडले आहे का? याची शंका असल्याने पोलिसांनी संबंधित कैद्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, अन्यथा हा प्रकारही ये रेऽ माझ्या मागल्या.. प्रमाणेच ठरण्याची शक्यता आहे.
गुरुवारी संगमनेर उपकारागृहातील चारही कोठड्यांची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांनी शिर्डी व कोपरगावच्या 31 आरोपींना पहिल्या क्रमांकाच्या बराकीत टाकले आहे. उर्वरीत दोन बराकीत न्यायालयीन व पोलीस कोठडीतील बंदीवानांसह जामिनाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे. तर एका कोठडीत पाच महिला कैदी आहेत. बुधवारी कारागृहात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचे गांभीर्य केवळ कैद्यांची आदलाबदल करुन कमी होणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन विचार करण्याची गरज असून बारा बाय विसच्या कोठडीत 20 कैद्यांच्या आणि अर्धाडझन रक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आहे. यापूर्वीही कैदी पलायन आणि त्यासाठी मोबाईलच्या वापराचा प्रकारही समोर आला होता. तीन महिन्यांतच पुन्हा कोठडीत मोबाईल पोहोचल्याने पोलिसांना आत्मचिंतनाचीही गरज निर्माण झाली आहे.
कैदी कोणाचे आणि बंदोबस्त कोणाचा?
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील उपकारागृहात केवळ संगमनेरच नव्हेतर घारगाव, आश्वी आणि तालुका पोलीस ठाण्यांचेही आरोपी असतात. पूर्वी यासर्व कैद्यांच्या अर्थात कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारीच पार पाडीत. मात्र गेल्या नोव्हेंबरमध्ये कोठडीचे गज कापून चार आरोपी पळाल्यानंतर ‘ज्या’ पोलीस ठाण्याचे कैदी, त्यांचाच बंदोबस्त हा नियम लागवण्यात आला. त्यानुसार बंदोबस्ताचे दिवस ठरवण्यात आले आहेत. सध्या संगमनेरच्या उपकारागृहात शिर्डी व कोपरगाव पोलीस ठाण्याचे 31 कैदीही ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेकांवर ‘मोक्का’ची कारवाई झालेली आहे. त्यातीलच एकाने कोठडीतून फोन करुन खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी शिर्डी व कोपरगाव पोलिसांना पत्र पाठवून त्यांच्या कैद्यांचा त्यांनीच बंदोबस्त करावा असे कळवले आहे. त्यामुळे लवकरच संगमनेरच्या कारागृहाला आता आंतरजिल्हा बंदोबस्तही बघायला मिळणार आहे.