आमच्या रक्तात आणि विचारांतच काँग्रेस ः तांबे पक्षश्रेष्ठींनी विचार करण्याची गरज असल्याचेही केले स्पष्ट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला पक्षातून बाहेर ढकलून दिलं आहे. पण, आमच्या रक्तात आणि विचारांतच काँग्रेस आहे. माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये २०३० मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. काही लोकांनी आम्हांला पक्षाबाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतंय की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत बोलावलं पाहिजे आणि ती जबाबदारी पक्षश्रेष्ठींची आहे. पण, आत्तापर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना पदवीधर निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनेबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या काळात जो काही इपिसोड झाला, तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. कशा पद्धतीने माझ्यावर राजकारण झालं आणि कशा पद्धतीने मला काँग्रेस पक्षातून बाहेर ढकलण्यात आलं. मीच एकटा नाही तर देशात चांगलं काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून करून पक्षाच्या बाहेर ढकलण्यात येतं ही चिंतेची बाब आहे. त्यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करण्याची गरज आहे, असेही खडे बोल सत्यजीत तांबे यांनी सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विषय आहे. किती लोकांवर कारवाई करायची, किती लोकांवर कारवाई करायची नाही. ती का करायची आणि का नाही करायची, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दोन धर्मांमध्ये, दोन जातीत आणि दोन पंथांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोंविदाने राहतात, हा इथला इतिहास आहे, असेही त्यांनी ‘लव्ह जिहाद’वरून विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कुरघोडीच्या राजकारणामुळेच आता नव्या तरुणांनी राजकारणात यायला हवं. नव्या राजकारणाची सुरुवात करण्याची आवश्यता आहे. ते नवं राजकारण चालू करत असताना युवकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.