अहमदनगर संघाने गाजवली राज्यस्तरीय योगासन स्पर्धा! अहमदनगर संघाला अजिंयपद; नागपूर दुसर्या तर मुंबई तिसर्या स्थानी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन दिवसांपासून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात सुरु असलेली चौथी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा अहमदनगरच्या योगासन खेळाडूंनी गाजवली. सबज्युनिअर आणि ज्युनिअर वयोगटातील चार प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर संघातील मुला-मुलींनी अतिशय अवघड श्रेणीतील योगासनांच्या सादरीकरणातून परीक्षकांनाही अवाक् करीत तब्बल बारा सुवर्णपदकांसह २१ पदकांची कमाई केली. संपूर्ण स्पर्धेतील उत्तुंग कामगिरीच्या बळावर अहमदनरगच्या संघाने चौथ्या राज्यस्तरीय स्पर्धेचा किताबही पटकाविला. एक सुवर्ण व पाच रौप्यपदकांसह दहा पदके मिळवणार्या नागपूर संघाने दुसरे तर, दोन सुवर्णसह सहा पदके मिळवणार्या मुंबई संघाने तिसरे स्थान मिळविले.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पारंपरिक योगासनांच्या सबज्युनिअर गटात नगरची तृप्ती डोंगरे व मुलांच्या गटात मुंबईच्या रोहन तायडेने सुवर्णपदक मिळवले. वैदेही मयेकर व अंश मयेकर या अहमदनगर संघातील भावंडांनी दोन्ही गटातील रौप्यपदके तर, याच प्रकारात मुलींच्या गटात नागपूरच्या तेजस्वीनी खिंची व अहमदनगरच्या आर्यन खरात यांनी कांस्यपदकांची कमाई केली. ज्युनिअर गटात वर्चस्वाची परंपरा कायम राखताना अहमदनगरच्या युगांका राजम् आणि सुमील बंडाळे यांनी सुवर्ण, तन्वी रेडीज्ने रौप्यपदक मिळवले. नागपूरच्या तेजस सावरकरने रौप्य आणि सुहानी गिरीपुंजे व पुण्याच्या अरविंद साबवत यांनी कांस्यपदके मिळवली.

कलात्मक एकेरी प्रकारातही ज्युनिअर गटात अहमदनगरच्या रुद्राक्षी भावे व प्रणव साहू यांच्यासह सबज्युनिअर गटातील प्रांजल व्हन्ना यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या सबज्युनिअर गटात मुंबईच्या रोहन तायडेने बाजी मारली. ज्युनिअर गटातील दोन्ही रौप्यपदके नगरच्या स्वरा गुजर व रुपेश सांगे यांनी तर, सबज्युनिअर गटात नागपूरच्या तेजस्वीनी खिंची व मुंबईच्या स्वराज फिसके यांनी पटकाविली. याच गटात कोल्हापूरच्या श्रिया खोंडरे व पुण्याच्या अरविंद साबवत यांनी तर, सबज्युनिअर गटात अहमदनगरच्या निरल वाडेकर व अंश मयेकर यांनी कांस्यपदके मिळवली.

कलात्मक दुहेरी प्रकारात सबज्युनिअर गटात अहमदनगरच्या वैदेही मयेकर व निरल वाडेकर आणि तन्मय म्हाळसकर व आर्यन खरात यांनी सुवर्ण कामगिरी केली. ज्युनिअर गटातील मुलांमध्ये अहमदनगरच्या संघाचेच वर्चस्व राहिले. प्रणव साहू व यश लगड यांनी सुवर्ण पटकावले मात्र मुलींच्या गटात कोल्हापूरच्या सेजल सुतार व श्रिया खोंडरे या जोडीने निकराची झुंज देत पहिला क्रमांक खेचून घेतला. नगरच्या तन्वी पवार व रुद्रांक्षी भावे आणि नागपूरच्या तेजस सावरकर व तन्मय सलोकर यांना रौप्य तर, नागपूरच्याच श्रावणी गोलाईत व रचना अंबुलकर आणि मुंबईच्या यश कारगुटकर व राहुल कोणे यांनी कांस्यपदक मिळवले. याच प्रकारातील सबज्युनिअर गटात नागपूरच्या निसर्गा भगत व आर्या इंगळे, मुंबईच्या स्वराज फिसके व कृष्णा गुप्ता या जोडीने रौप्य, फिनत मोमीन व स्वराध्या एरंडोले आणि कोल्हापूरच्या जयवर्धन खोत व नैतिक पाटील या जोडीने कांस्यपदक मिळवले. तालात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातील ज्युनिअर गटात युगांका राजम् व स्वरा गुजर आणि पीत बोरकर व निबोध पाटील यांनी अहमदनगर संघाला सुवर्ण पदके मिळवून दिली. नागपूरच्या सुहानी गिरीपुंजे व रचना अंबुलकर आणि सोलापूरच्या ऋषीकेश पेड्डूल्लू व ऋषीकेश पुत्था यांनी रौप्य, सोलापूरच्याच जान्हवी चंदनशिवे व प्रणाली शिंदे आणि नाशिकच्या रोहित कदम व पवन अहिरे यांच्या जोडीने कांस्यपदकांची कमाई केली.

सबज्युनिअर गटातही अहमदनगरच्या मुलींनी बाजी मारताना तृप्ती डोंगरे व देवांशी वाकळे या जोडीने सुवर्णपदक मिळवले. मुलांमध्ये नागपूरच्या यज्ञेश वानखेडे व खूश इंगोले या जोडीने सुवर्ण, मुंबईच्या आर्या साप्ते व रुर्ग्वेदा मूळगावकर आणि कोल्हापूरच्या ओम जगताप व धनंजय हिरेमठ यांनी रौप्य, नागपूरच्या निधी हडके व पूर्वा मानकर आणि रत्नागिरीच्या श्लोक दळवी व श्री दळवी या भावंडांच्या जोडीने कांस्यपदके मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत बारा सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्यपदकांसह २१ पदकांची कमाई करणार्या अहमदनगरच्या योगासन संघाला अजिंयपद देण्यात आले. एक सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदकांसह दहा पदके मिळवणार्या नागपूर संघाला दुसरे तर, दोन सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक मिळवणार्या मुंबई संघाला तिसरे स्थान देण्यात आले. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीष मोहगावकर, सचिव राजेश पवार, प्राचार्या अर्चना घोरपडे व स्पर्धा संयोजक महेश कुंभार आदींच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
