पहिल्याच पावसात शेवगाव-पांढरी पूल रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ पडले उघडे

नायक वृत्तसेवा, शेवगाव
पहिल्याच पावसाने शेवगाव-पांढरी पूल रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डे, चिखल आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक व नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर बुजवलेले व न बुजवलेले खड्डे पहिल्याच पावसात पाण्याने तुडूंब भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

शेवगाव मिरी पांढरीपूल हा रस्ता अहमदनगर, राहुरी व शनिशिंगणापूर येथे जाणार्‍या वाहनांसाठी व नागरिकांसाठी प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने तालुका हद्दीतील निंबेनांदूर, माका शिवारापर्यंत तो जागोजागी खचला व फुटला होता. त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे काही ठिकाणी बुजविण्यात आले. तर माका जवळील खारा ओढा ते निंबेनांदूर विद्यालय या दरम्यान नवीन रस्ता करण्यात आला. मात्र निंबेनांदूर ते ढोरजळगाव, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव या दरम्यान मात्र गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात पडलेले खड्डेही अद्याप बुजवलेले नाहीत.

पावसाळ्यापूर्वीची इतर डागडुजीची कामे यावर्षी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसाने हा रस्ता जागोजागी चिखलात गेला आहे. रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पावसाळा सुरु होताच वाहन चालकांची व नागरिकांची तारेवरची कसरत सुरु झाली आहे. रस्त्यावरील पाणी चर खोदून बाजूला न काढल्याने व दुतर्फा वाढलेली झुडपे न काढल्याने रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे.

ढोरजळगाव येथील नाकाडे वस्ती व बसस्थानक परिसर, मळेगाव वस्ती येथील फरशी पूल व निकम वस्ती, वडुले बुद्रुक बसस्थानक परिसर आपेगाव येथील पेट्रोल पंप या परिसरातील रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यात पहिल्याच पावसाचे पाणी साचल्याने दुरवस्थेत भर पडली आहे. या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील वर्षी खड्डे बुजवताना मंजुरीसाठी पाठवलेल्या भागाच्या पॅचिंगचे काम मागे ठेवले होते. मात्र, कोविड संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून मंजूर झालेल्या या कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. आता या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामास सुरवात करण्यात येईल.
– अंकुश पालवे (सहाय्यक अभियंता, बांधकाम विभाग)

Visits: 291 Today: 1 Total: 2168190

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *