भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास तरुणाईने नसानसात भिनवावा ः डॉ. मालपाणी लायन्स सफायरच्या ‘संघर्षातून समृद्धीकडे’ व्याख्यानाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित स्वातंत्र्योत्सव कार्यक्रमामध्ये डॉ. संजय मालपाणी यांच्या संघर्षातून समृद्धीकडे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास, संस्कृती आजच्या तरुणाईने अभ्यासली पाहिजे, असे मत व्याख्याते डॉ. संजय मालपाणी यांनी मांडले.

गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून 1100 वह्या यावेळी लायन्स क्लबच्या दात्यांकडून डॉ. संजय मालपाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. मशाल पेटवून क्रांतीकारकांचे नमन करण्यात आले. प्रकल्पप्रमुख श्रीनिवास भंडारी आणि लायन्सचे अध्यक्ष उमेश कासट यांनी डॉ. संजय मालपाणी यांचा सत्कार केला. मंचावर गिरीश मालपाणी, कल्याण कासट, गौरव राठी, रोहित मणियार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी यांनी केले. परिचय सुदीप हासे यांनी करुन दिला तर सूत्रसंचलन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले.

भारतावर 1000 वर्षांपासून परकीयांचे अतिक्रमण सुरु होते, परंतु मातृभूमीसाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. गुरु गोविंद सिंह आणि त्यांच्या मुलांचा इतिहास ऐकताना श्रोते भावुक झाले. इतिहासात प्रत्येकवेळी आप्तेष्ठांनी फितुरी केल्यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो. जोरावर सिंह आणि फतेह सिंह हे गुजरीदेवी म्हणजेच आपल्याच आजीबरोबर नदी पार करत असताना नोकराने फितुरी करून त्यांना वजीर खानच्या ताब्यात दिले. अवघ्या 9 वर्षांचा जोरावर आणि 6 वर्षांचा फतेह यांना भिंतीमध्ये दाबून मारण्यात आले. सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास स्फुरण चढविणारा आहे. छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा फितुरीमुळे कैद व्हावे लागले. चंद्रशेखर आझाद कोठे आहेत याची खबर ब्रिटिशांना फितुराने दिली आणि त्यानंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून त्यांनी वीरमरण पत्करलं. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू अशा अनेक क्रांतिकारकांनी केलेल्या संघर्षामुळे हा देश स्वतंत्र झाला.

चंद्रशेखर आझाद यांच्या आई जगरानी देवी यांचे निधन झाले. वीरपुत्राची आई आणि अनेकांना प्रेरणा देणार्या जगरानी देवी यांचा झाशीमध्ये पुतळा उभारायचा असे ठरले. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या पुतळ्याला विरोध करत झाशीमध्ये सरकारकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 3 तरुण मृत्यूमुखी पडले. देश स्वतंत्र झाला असला तरी गुलामगिरीची भावना अजूनही शिल्लक आहे, ती नष्ट केली पाहिजे असे डॉ. मालपाणी यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा रशियामध्ये आक्रमण झाले तेव्हा तेव्हा तेथील सामान्य नागरिक देशासाठी लढले. त्यामुळे रशिया आजही अमेरिकेला आव्हान देण्याचे सामर्थ्य ठेवतो. जाज्वल्य देशप्रेम असल्यामुळेच आणि संघर्ष केल्यामुळे औद्योगिक, अंतराळ आणि विविध क्षेत्रात रशियाने समृद्धी मिळवली आहे. हिरोशिमा आणि नागासाकी हल्ल्यानंतरही जपानच्या देशप्रेमी नागरिकांनी समृद्धी साधली आहे.

भारतीयांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी इंग्रजांनी गुलामगिरीचेच शैक्षणिक धोरण अवलंबले. नालंदासारखी विद्यापीठे आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीमुळे प्राचीन भारत सुधारित आणि अग्रेसर होता. मात्र इंग्रजांनी घालून दिलेली गुलामगिरीची शिक्षण पद्धती अजूनही आपण अवलंबत आहोत. भारतीय योगपद्धत हजारो वर्षे जुनी आहे. मात्र आपल्या अक्षम्य चुकांमुळे आसनांची संख्या अतिशय कमी झाली. आम्ही नव्याने 85 पेक्षा जास्त नवीन आसनांची त्यांच्या संस्कृतमधील नावासहित भर घातल्याचे डॉ. मालपाणी यांनी सांगितले. गीतेचा प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी गीता परिवाराच्या माध्यमातून 131 देशांमध्ये 4500 स्वयंसेवकांच्या सहाय्याने 1100 पेक्षाही जास्त ऑनलाईन क्लास घेतल्याचे डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले. आजच्या युवा पिढीने चंगळवादापेक्षा राष्ट्रभक्ती, व्यायाम, उत्तम आहार, शिक्षण, संस्कार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. इतिहासात या ज्यावेळी संघर्ष झाला त्या-त्यावेळी समृद्धी आली. आपला संघर्ष आता गुलामगिरीच्या मानसिकतेविरोधात आहे. आपल्या देशाचा, संस्कृतीचा अभिमान बाळगणे आणि चांगले नागरिक बनून आपापल्या कामातून देशाची सेवा करणे हाच समृद्धीचा मार्ग असल्याचे डॉ. मालपाणी यांनी सांगितले. या कार्यक्रमास उद्योजक राजेश मालपाणी, मनीष मालपाणी, एस. झेड. देशमुख, किसन हासे, श्रीकांत कासट, ज्ञानेश्वर कर्पे, लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मेणबत्ती पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
