भाषा मरते तेव्हा स्वातंत्र्याची प्रेरणा मरते ः वाकचौरे संगमनेर न्यायालयात भाषा संवर्धन दिनानिमित्ताने व्याख्यान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाषा मरण पावली की स्वातंत्र्याची प्रेरणा मरते. त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा जीवंत राहण्याची गरज आहे. जगातील बोलीभाषा मृत पावण्याचे प्रमाणात गेले काही वर्ष सातत्याने वाढ होते आहे, अशावेळी भाषेचा विचार मनामनात आणि घराघरात रूजविण्याची गरज आहे. आधुनिक काळात मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम व पूनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी केले.
![]()
संगमनेर तालुका विधी समिती व वकील संघाच्यावतीने संगमनेर न्यायालयात आयोजित भाषा संवर्धन दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा होते. यावेळी व्यासपीठावर सर्व न्यायिक अधिकारी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना वाकचौरे म्हणाले, भाषा ही जीवनातील अनन्यसाधारण गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर भाषेविषयी अभिमान बाळगणारे अनेक देश आहे. आज ज्या भाषा समृध्द होत गेल्या आहेत त्या सर्व भाषा समृध्द करण्यासाठी जाणीवपूर्वक अभ्यासकांनी प्रयत्न केले आहेत. जगात कोणतीही एक भाषा ज्ञानभाषा असत नाही. प्रत्येक भाषेत ज्ञानभाषा बनण्याची शक्ती सामावली आहे. नव्या माहिती -तंत्रज्ञानाशी जोडत भाषा समृध्दतेचा प्रवास महत्वाचा आहे. आपण मराठी भाषा संवर्धित करायची असेल तर मुलांच्या शिक्षणाच्या विचारांचे आदानप्रदान मराठी भाषेत करण्याची गरज आहे. मराठी पुस्तके हाती देण्याबरोबर वाचन संस्कृती संवर्धन करण्याची गरज आहे. शब्दकोश हे भाषेचे वैभव आहे. इंग्रजीत सातत्याने त्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, मराठी भाषेतून जितका व्यवहार होईल तितक्या मोठ्या प्रमाणावर तिचे संवर्धन होणार आहे. मराठी भाषेसारख्या समृध्द भाषेचे आपण वारकरी आहोत. आपल्याकडील संत साहित्याने मराठी भाषेचे वैभव उंचावले आहे. मराठी साहित्यातील विविधता देखील दखलपात्र आहे. मराठी भाषे संदर्भाने आपण अभिमान बाळगत जीवन व्यवहार सुरू ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश अमेठा म्हणाले, वकिलांनी अधिकाधिक व्यवहार मराठीत करण्याची गरज आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या भाषेत निकाल दिले जावेत असे आवाहन केले आहे. त्यामुळे आपण मराठीचा व्यवहार वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी देखील मराठीची गरज न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी न्यायाधीश सर्वश्री वाय. पी. मनाठकर, डी. आर. देशपांडे, एम. एम. शेख, एस. एस. बुद्रुक, एस. यू. महादर, एस. पी. बाबर, डी. एच. दाभाडे, जी. बी. देशमुख, एस. एम. वाघमारे, पी. डी. देवरे, एम. एम. गांगुर्डे, पी. आर. पालवे, जे. एम. गायकवाड, डी. एम. गिरी, वकील संघाचे उपाध्यक्ष उदयसिंह ढोमसे, अमोल घुले, तात्यासाहेब गुंजाळ, मोहन फंटागरे, अविनाश गोडगे, बाळासाहेब राऊत, नानासाहेब शिंदे, विजय उगले, समीर फटांगरे, पंकज कडलग, प्रदीप मालपाणी, सदाशिव थोरात यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा काळे यांनी केले तर आभार माया पवार यांनी मानले.
