‘फूटपाथ’ की ‘फूटशॉप’ अशा संभ्रमात अडकला महामार्ग! प्रशासनाची एकमेकांकडे बोटं; पालिकेच्या कारवाईत दिसतोय दुजाभाव


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेसुमार अतिक्रमणांमुळे वारंवार होणारा वाहतूक खोळंबा आणि त्यामुळे घडणार्‍या अपघाती घटना टाळण्यासाठी शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणासह रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यातून अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानकापर्यंत पूर्ण झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा पादचार्‍यांसाठी स्वतंत्र मार्गही तयार करण्यात आला आहे. मात्र आता या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या संपूर्ण फूटपाथवरच अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान बसवल्याने हा पादचारी मार्ग पादचार्‍यांसाठी की अतिक्रमणधारकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पालिकेने अतिक्रमण हटाओ मोहिमेतून गावठाणातील अनेकांना बेरोजगार केलेले असताना दुसरीकडे महामार्गावर पादचारी आणि वाहनांची कोंडी करणार्‍यांना मात्र अभय दिले जात आहे. त्यामुळे पालिका कारवाईतही दुजाभाव करीत असल्याचे आरोप आता होवू लागले आहेत.

संगमनेर शहराच्या मध्यातून जाणारा ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्ग म्हणजे उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारा राज्यातील प्रमुख रस्ता. त्यामुळे या महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात प्रवाशी आणि माल वाहतूक होत असते. पूर्वी अतिशय अरुंद असूनही मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आणि त्यातच कर्‍हे, चंदनापुरी, माऊली, बोटा असा घाटरस्ता यामुळे या महामार्गावर अपघाती घटनाही नित्याचाच भाग होता, त्यातूनच या रस्त्याला ‘मृत्यूघंटा’ म्हणूनही ओळखले जावू लागले होते. मात्र सहा वर्षांपूर्वी या महामार्गाला पर्याय म्हणून सिन्नर ते खेडपर्यंतच्या महामार्गाचे खासगीकरणातून चौपदरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले. त्यातून नियमित होणार्‍या अपघाती घटना कमी झाल्या, मात्र त्या पूर्णतः थांबू शकल्या नाहीत. या मार्गाच्या नूतनीकरणानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल ही अपेक्षाही फोल ठरली आहे.

त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करीत शहरातून जाणार्‍या या महामार्गाच्या नूतनीकरण व रुंदीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवला. त्यातून रायतेवाडी फाटा ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयपर्यंतच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मिळाले. सध्या अमृतवाहिनी ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तर, रायतेवाडी फाट्यापासून शहराच्या दिशेने दुसर्‍या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नूतनीकरणातून वाहतूक कोंडी आणि अपघाती घटना टळाव्यात असाच यामागील प्रमुख हेतू होता, पण शहरातील वाढत्या अतिक्रमणांनी तो फोल ठरवला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या या महामार्गाच्या नूतनीकरणातून अमृतवाहिनी ते विश्रामगृहापर्यंत रस्ता रुंदीकरण व दुतर्फा पादचार्‍यांसाठी स्वतंत्र ‘फूटपाथ’ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र आता या फूटपाथवरच अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान बांधल्याने नूतनीकरणानंतरही हा मार्ग मोकळा श्वास घेवू शकलेला नाही. संगमनेर महाविद्यालय ते विश्रामगृह इतया मोठ्या अंतरात महामार्गावर सर्वत्र अशीच स्थिती असून बहुतेक अतिक्रमणधारकांनी कायमस्वरुपी हातगाड्या व टपर्‍या आणून बसवल्याने म्हणायला ‘फूटपाथ’ असलेला पादचारी मार्ग आता ‘फूटशॉप’सारखा दिसू लागला आहे. त्यातच अशा अतिक्रमित दुकानांमध्ये येणार्‍या ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची वाहने महामार्गावरच उभी राहतात, त्यामुळे वाहतूक कोंडीही होते आणि अधुनमधून अपघाती घटनाही समोर येतात.

दोन महिन्यांपूर्वी जोर्वेनायावर अशाच अतिक्रमणधारकांची मुजोरी उफाळून समोर आली आणि त्यातून संपूर्ण शहराचे सामाजिक स्वास्थ खराब झाले. त्यामुळे पालिकेने घाईघाईने जोर्वेनायासह गावठाणातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली व आजही त्यात सातत्य ठेवले. पालिकेच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र नूतनीकरण झालेल्या संपूर्ण महामार्गावर अतिक्रमणधारकांनी आक्रमण करुनही त्यांच्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे गावठाणातील अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून एका भागाला एकतर दुसर्‍या भागाला दुसरा न्याय कसा? असा सवाल विचारला जावू लागला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही आपले हात वर केले असून अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचे दाखले दिले जात आहेत.

त्यामुळे पालिकेने ज्या पद्धतीने नवीन नगररस्ता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते चावडी, मेनरोड या भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी सातत्य ठेवले आहे, तशीच कारवाई बसस्थानकापासून घुलेवाडीच्या दिशेने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या अतिक्रमणांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे, अन्यथा हा विरोधाभास नागरी असंतोषाचे कारण ठरण्याची दाट शयता निर्माण झाली आहे. शहरातील सगळेच रस्ते अतिक्रमण आणि अपघातमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे, त्यांनी नागरी हित लक्षात घेवून अतिक्रमणधारकांनी बळकावलेला पादचारी मार्ग मोकळा करावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक, विश्रामगृह यासारख्या वर्दळीच्या ठिकाणांसह सह्याद्री विद्यालय व महाविद्यालय, संगमनेर महाविद्यालय, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने या रस्त्यावर वाहनांसह पायी चालणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. त्यासाठीच या पदाचारी (फूटपाथ) मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र त्यावर सर्वत्र अतिक्रमणे थाटल्याने या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 30766

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *