… अखेर तिसर्‍या दिवशी लहुजी सेनेचे उपोषण स्थगित पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील मटका जुगार सोरट, दारू यांसारख्या अवैध व्यवसायांवर कारवाई करावी. या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने सलग तीन दिवस तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आले. मात्र कोणतीच अशी ठोस कार्यवाही न झाल्याने भारतीय लहुजी सेनेने उपोषण स्थगित करत असून अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण यांनी जाहीर केले.

नेवासा तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करताना मटका, जुगार, सोरट चालविणार्‍या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेने याआधी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भारतीय लहुजी सेनेने 20 डिसेंबरपासून उपोषण सुरू केले. मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई तिसर्‍या दिवशी न केल्याने येथील उपोषण स्थगित करून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांनी घेतला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना याबाबत दुसरे नवीन निवेदन देण्यात आले. याबाबत आपण ठोस कारवाई करू अशी ग्वाही थोरात यांनी दिली. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी चार वाजता उपोषण स्थगित करण्याचा निर्णय झाला. या उपोषणाला प्रारंभीच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण, बहुजन मुक्ती पार्टीचे गणपत मोरे यांनी पाठिंबा दिला होता. लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफ पठाण, जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण, बहुजन मुक्ती मोर्चाचे गणपत मोरे, बहुजन चळवळीतील रमेश राजगिरे, महिला आघाडी प्रमुख ज्योती भोसले उपस्थित होते.

पोलिसांनी कोणतीही कारवाई केली तर नाही उलट आमच्या उपोषणाकडे देखील गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे अवैध चालकांशी असलेले लागेबांधे किती भक्कम झाले आहे हे कळले. आता 10 जानेवारीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही उपोषण करणार असून अवैध व्यवसाय बंद न करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर बदलीची कारवाई करावी अशी आमची मागणी राहणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Visits: 223 Today: 1 Total: 2123781

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *