शिर्डीत साईंच्या तिजोरीत नोटांचा ओघ पुन्हा वाढणार? दोन हजार रुपयांची नोटबंदी; सहकारी बँकांच्या भूमिकेवरही लक्ष


नायक वृत्तसेवा, शिर्डी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपये मूल्याची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे कोठे काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मागील वेळी अचानक बंद केलेल्या नोटा भाविकांना शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील दानपेटीत टाकल्या होत्या. त्यामुळे संस्थानची डोकेदुखी वाढली होती. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा अवधी असल्याने असे प्रकार होण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या बंद झालेल्या नोटा दानपेटीत टाकण्यात आल्या होत्या. सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या या नोटा आल्या होत्या.

शिर्डीत येणारे भाविक दानपेटीत पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूही टाकतात. पूर्वी नोटाबंदीचा निर्णय अचानक घेण्यात आला होता. त्यामुळे बदलून मिळण्याची शक्यता वाटत नसलेल्या, किंवा तो त्रास नको असलेल्या भाविकांनी या नोटा दानपेटीत टाकल्या होत्या. संस्थानकडून नियमितपणे बँकेत भरणा केला जात असल्याने मुदत आलेल्या नोटा बँकेत भरल्या गेल्या होत्या. सर्व मुदत संपल्यानंतरही सुमारे 71 लाख रुपयांच्या नोटा संस्थानकडे आल्या होत्या.

या अनुभवावरून आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर काय होईल, याची उत्सुकता आहे. मात्र, मागील वेळी झाला एवढा त्रास आणि गोंधळ यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत आहे. त्यामुळे लोक नोटा बदलून घेऊ शकतील. शिवाय या नोटा दानपेटीत टाकल्या गेल्याच, तरीही फारसा त्रास होणार नाही. साईबाबा संस्थानकडे आलेल्या दानाची मोजदाद दर मंगळवारी आणि शुक्रवारी केली जाते. ही रक्कम लगेच बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्याच तर त्या लगेचच बँकेत जाणार आहेत. मुळात नोटांची मोजदाद करणार्‍यांना असे आढळून आले आहे की, गेल्या काही काळापासून दानपेटीत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण खूपच घटले आहे. मात्र, पूर्वीच्या नोटबंदीनंतर जुन्या नोटा दानपेटीत येण्याचे प्रमाण वाढले होते. तसे दोन हजाराच्या नोटांचेही वाढू शकते, असा अंदाज आहे. मात्र ते वाढले तरीही फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

मागीलवेळी नोटबंदी झाल्यावर काही काळ त्या सहकारी बँकेत भरण्याचीही मुभा होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा सहकारी बँकांत जमा झाल्या. मात्र, यात गैरप्रकार होत असल्याचा संशय आल्यावर सरकारने नियम बदलत सहकारी बँकांकडील हे अधिकार काढून घेतले. एवढेच नव्हे तर विशिष्ट काळानंतर त्यांच्याकडे जमा झालेल्या नोटा आरबीआयने स्वीकारणे टाळले. त्यामुळे सहा वर्षांनंतरही सुमारे 118 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकात आजही पडून आहेत. आता दोन हजार रुपयांच्या नोटांच्यासंबंधी सहकारी बँका काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.

Visits: 91 Today: 2 Total: 1105291

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *