संगमनेर पोलिसांनी इराणी टोळीतील चोरटा पकडला! अनेक गुन्ह्यांची उकल होणार; अकोले नायावरील गुन्ह्याची कबुली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या विविध भागात गेल्या मोठ्या कालावधीपासून सुरु असलेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रकरणांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी रविवारी श्रीरामपूरच्या कुख्यात इराणी टोळीतील एकाच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून संगमनेरातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. रविवारी त्याला अटक केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अकोले नाक्यावरील एका ८५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील एकतोळा वजनाची सोनसाखळी लांबवल्याची कबुली त्याने दिली असून आरोपीकडून आणखी ८ ते १० गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याचे तपासी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता वाढली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी ४ जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अकोले नाक्यावरील काठेमळा परिसरात राहणार्‍या सुमनबाई दत्तात्रय थिटे (वय ८५) ही वृद्ध महिला आपल्या घराच्या ओट्यावर बसलेली होती. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील एकतोळा वजनाची सोन्याची पोत ओढून तेथून पोबारा केला होता. यावेळी त्या वृद्धेने आरडाओरड केल्यानंतर घरातच असलेल्या त्यांच्या नातवाने पळून जाणार्‍या चोरट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते दोघेही सुसाट वेगाने पळून गेले. याप्रकरणी सुमनबाई थिटेे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरु असताना उपलब्ध पुराव्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून त्यात श्रीरामपूर येथील इराणी टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा निष्कर्ष स्थानिक तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी काढला होता. त्यानुसार आरोपीच्या शोधासाठी त्यांनी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचीही मदत मागतिली होती. या दोन्ही पथकांकडून समांतरपणे या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असतानाच रविवारी (ता.६) संगमनेरातील ‘त्या’ प्रकरणात सहभागी असलेला आरोपी श्रीरामपूरच्या वॉर्ड क्रमांक दोनमधील घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत श्रीरामपूरातून सलमान सलीम इराणी (वय २३) या सराईत गुन्हेगाराला अटक केली.

शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दोन महिन्यांपूर्वी काठेमळा येथील सुमनबाई थिटे यांच्या गळ्यातील पोत लांबविल्याच्या प्रकरणाची कबुली दिली असून चोरीला गेलेले निम्मे सोनेही हस्तगत झाले आहे. सदरचा आरोपी अतिशय सराईत असून तो श्रीरामपूरच्या कुख्यात इराणी टोळीचा सक्रीय सदस्यही आहे. गेल्या काही दिवसांत शहर व परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या आठ ते दहा गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय असून त्याच्या पोलीस कोठडीतून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या मोठ्या कालावधीपासून संगमनेर शहर व उपनगरातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार वारंवार घडत होते. मात्र पोलिसांना तपासाची दिशाच सापडत नव्हती, त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना आता शहरातील अशा घटनांमध्ये कुख्यात इराणी टोळीचा सहभाग असल्याचे समोर आल्याने व त्यातील एकाच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आल्याने शहरातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 300804

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *