राहुरीमध्ये भामट्याने वृद्धेचे दागिने लंपास केले
नायक वृत्तसेवा, राहुरी
सरकारी योजनेचा बहाणा करुन एका भामट्याने वृद्धेचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच राहुरी पालिका परिसरात घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कमरुनिसा युसूफ शेख (वय 70, रा.राहुरी फॅक्टरी) ही वयोवृद्ध महिला राहुरी शहरातील आपल्या नोतवाईकाकडे आली होती. यावेळी बसस्थानकात उतरुन पालिका इमारत जवळून खाटीकगल्ली येथे पायी जात होत्या. यावेळी एक अज्ञात भामटा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला मी पालिकेचा सरकारी कर्मचारी आहे. सरकारी योजनेमध्ये गरीब लोकांना 12 हजार रुपये देत आहे. मी तुम्हाला ते 12 हजार रुपये सरकारतर्फे देतो असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर भामट्याने वृद्धेला पालिकेच्या वाहनतळामध्ये नेले आणि योजनेसाठी तुमचे एक छायाचित्र लागेल असे सांगून दागिने काढून ठेवण्यास सांगितले. वृद्धेने सर्व दागिने काढून एका पर्समध्ये ठेवून शेजारील महिलेकडे दिली. त्यानंतर भामट्याने वृद्धेला पालिकेत जावून येतो असे सांगून बाहेर थांबविले व दुसर्या महिलेजवळ ठेवलेले दागिने घेवून फरार झाला. बराच वेळ झाला तरी तो भामटा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वयोवृद्ध महिलेने नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद नोंदविली.