मोहरमच्या मिरवणुकीला संगमनेरात गालबोट! सवारीलाच धक्काबुक्की; एकाच्या डोक्यात फाईट मारली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्बलाच्या लढाईत हजरत इमाम हुसेन यांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी मोहरमच्या निमित्ताने काढल्या जाणार्‍या मिरवणुकीला शुक्रवारी संगमनेरात गालबोट लागले. मोहरमनिमित्ताने शुक्रवारी रात्री निघालेल्या मिरवणुकीत जोर्वेनाका येथील एकाने सवारीलाच धक्काबुक्की केल्याने त्याची विचारणा करणार्‍या अश्पाक अल्ताफ शेख या तरुणाच्या डोक्यात लोखंडी फाईटने प्रहार करण्यात आला. त्यात अश्पाक याच्या डोक्याला दुखापत झाली असून मध्यरात्री त्याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तलहा करीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मोगलपूरा मशिदीच्या पाठीमागील शिकलकर गल्लीत घडली. सालाबादप्रमाणे जेधे कॉलनी येथील समीर राजू शेख यांच्या अंगात सवारी येत असल्याने त्याच कॉलनीत राहणारा अश्पाक अल्ताफ शेख (वय 32) व जमीर राजू शेख हे दोघे समीर शेख यांच्यासह सवारी घेवून जेधे कॉलनी, मेनरोड, सय्यदबाबा चौक मार्गाने गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास ते दोघेही अंगात सवारी असलेल्या समीर शेख याला घेवून शिकलकर गल्लीतून मोगलपूरा मशिदीकडे जात असतांना जोर्वे नाक्यावरील तलहा शेख याने समीर शेख यांना धक्का दिला.


त्यावरुन अश्पाक व जमीर शेख यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याचा राग येवून तलहा शेख याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी फाईटने अश्पाक याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यातून रक्तस्रावही सुरु झाला. मात्र त्यावेळी त्याच्यासह जमीर शेख याने सवारी अंगात असलेल्या समीर शेख याला साथ दिलेली असल्याने त्याही अवस्थेत ते तिघेही तेथून पुन्हा जेधे कॉलनीत आले. यावेळी अश्पाक याने घडला प्रकार आपल्या वडीलांना सांगितल्यानंतर आज मध्यरात्रीनंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी जोर्वेनाका येथील तलहा करीम शेख याच्या विरोधात घातक शस्त्रांचा वापर करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने संगमनेरातील मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *