बाळासाहेब थोरात राष्ट्रीय राजकारणात? राज्याच्या प्रभार्यांकडून कौतुक आणि सूचक व्यक्तव्याने चर्चांना उधाण..

नायक वृत्तसेवा, शिर्डी
महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राबविलेली एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी ठरली होती. थोरात हे राष्ट्रबांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्त्व आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि देशातील अन्य राज्यातही ते अतिशय लोकप्रिय नेते आहेत, त्यांना देशातून मोठी मागणी असल्याचे सूचक वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी आज शिर्डीत केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून बाळासाहेब थोरातांचे राष्ट्रीय वजन वाढल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

शिर्डीत आज काँग्रेसच्या उत्तर महराष्ट्रातील पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांच्यासह मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेसचे सचिव बी.एम.संदीप, कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, आमदार डॉ.सुधीर तांबे, लहु कानडे, हिरामण खोसकर, शिरीष चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी बोलतांना पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक करतांना त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. कृषी कायद्यांच्या विरोधात त्यांनी राबविलेली अभिनव मोहीम अत्यंत यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसची परंपरा त्यागाची आणि बलिदानाची असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने राष्ट्र उभारणीचे काम केले. मात्र सात वर्षांपूर्वी सत्तेवर आलेला भाजपा सातत्याने खोटे बालून देशातील नागरिकांची दिशाभूल करीत आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणार्यांपासून देशाला वाचवण्याची आज गरज असून या लढ्यात बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगतांना त्यांनी थोरात हे राष्ट्रबांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. काम कमी आणि जाहीरात अधिक असलेल्या भाजपने देशातील नागरिकांना वार्यावर सोडल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. करोनाच्या संकटात केंद्र सरकार पूर्णतः अपशयी ठरल्याचा घणाघात करतांना देश सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण लक्षात घेता केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन भाजप सुडबुद्धीचे राजकारण करीत आहे व त्यातून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगतांना भाजपाला रोखण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

