दोन वेगळ्या घटनांत दोघांना बेदम मारहाण! विद्यार्थी व गृहस्थ जखमी; दोन महिलांसह सहा जणांचा समावेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मावशीला मारहाण का केली म्हणून दोघा महिलांनी इंदिरानगरमधील एका गृहस्थाला तर चॉकलेटचा कागद फेकून मारल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याच्या घटना शुक्रवारी समोर आल्या. यातील पहिली घटना इंदिरानगरमध्ये तर दुसरी घटना संगमनेर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. याप्रकरणी दोन स्वतंत्र तक्रारींवरुन शहर पोलिसांनी दोन महिलांसह सहा जणांच्या विरोधात घातक शस्त्रांचा वापर करुन मारहाण केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना शुक्रवारी (ता.२८) सकाळी आठच्या सुमारास इंदिरानगरमध्ये घडली. या घटनेत इंदिरानगरच्या गल्ली क्रमांक सातमध्ये राहणार्या नलिनी बाळासाहेब संबूस व नवीन नगर रस्त्यावरील अश्विनी अविनाश भंडारी या दोघा महिलांनी विनोद बाजीराव रासकर (वय ४८, रा.इंदिरानगर) यांच्या घरी जावून ‘आमच्या मावशीला मारहाण का केली?’ असा सवाल केला. त्यातून शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर भंडारी यांनी शिवीगाळ करीत फिर्यादीच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला चावा घेत जखमी केले. तर, संबूस यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याबाबत जखमी झालेल्या रासकर यांनी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी अश्विनी अविनाश भंडारी (रा.नवीन नगर रोड) व नलिनी बाळासाहेब संबूस (रा.इंदिरानगर गल्ली नं.७) या दोघा महिलांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक थोरात यांच्याकडे सोपविला आहे. तर यातील दुसरी घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.
या घटनेत महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रवेशद्वारावर थांबलेल्या रवींद्र भूषण कोळी या सोळावर्षीय विद्यार्थ्याला गोकुळ शिंदे या तरुणाने चॉकलेटचा कागद चोळामोळा करुन फेकून मारला. त्यावर संबंधित विद्यार्थ्याने असे का केले याची विचारणा केली असता त्याने आपल्या हातातील लोखंडी कड्याने त्या विद्यार्थ्याच्या तोंडावर प्रहार करुन त्याला जखमी केले. यावेळी तेथे हजर असलेल्या शिंदे याच्या अज्ञात तिघा नातेवाईकांनीही त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे वडील भूषण कोळी यांनी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यावरुन पोलिसांनी आरोपी गोकुळ शिंदे (रा.सायखिंडी) व त्याच्या अज्ञात तिघा नातेवाईकांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत पुढील तपास महिला पोलीस नाईक डुंबरे यांच्याकडे सोपविला आहे. महाविद्यालय सुटण्याच्यावेळी झालेल्या या हाणामारीने परिसरात काहीकाळ गोंधळही निर्माण झाला होता.