शिर्डीत पर्यटक माहिती केंद्र सुरू होणार

नायक वृत्तसेवा, शिर्डी
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यात विविध तीर्थक्षेत्रे व नैसर्गिक, ऐतिहासिक असे पर्यटनस्थळे असून यांची अद्ययावत माहिती बाहेरून आलेल्या भाविकांना व पर्यटकांना मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आता शिर्डीत पर्यटक माहिती केंद्र सुरू होणार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शिर्डीत दरवर्षी देशातून व परदेशातूनही लाखो भाविक येत असतात. त्यातील अनेकजण शिर्डी व तर काही शनिशिंगणापूर करून परत जातात. अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा असून ऐतिहासिक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले व निसर्ग समृद्धीने नटलेल्या भंडारदरा धरण, निळवंडे धरण, रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल, कळसूबाई शिखर, रतनवाडी, सानंददरी, अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महल, नेवासे येथील संत ज्ञानेश्वरांचे मंदिर, देवगड, सिद्धटेक यांसह हिवरेबाजार, राळेगणसिद्धी असे पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. या सर्व पर्यटन व निसर्गस्थळांची माहिती बाहेरून आलेल्या भाविकांना व पर्यटकांना मिळाली तर त्यांनाही हे वैभव पाहता येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाला ही मोठी चालना मिळणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती वाढून त्याठिकाणच्या ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला मजबुती मिळणार आहे म्हणून शिर्डी येथे पर्यटनाची माहिती देणारे अद्ययावत पर्यटन माहिती केंद्र सुरू व्हावे; यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. या मागणीला मंत्री ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला शिर्डी येथे पर्यटन माहिती केंद्र सुरू करून त्याठिकाणी 2 व्यक्तींची कायमस्वरूपी नेमणूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज पोलीस चौकीमध्ये हे माहिती केंद्र सुरू होणार आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्यटनाला चालना मिळणार असून तरुणांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 116456

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *