राज्यातील मंदिरे उघडा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू! भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसलेंचा सरकारला इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान करतो की, तिसर्या श्रावणी सोमवारला राज्यातील मंदिरे उघडली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू. अध्यात्मिक क्षेत्रातील हा अन्याय सहन करणार नाही. मंदिरांवर अवलंबून असलेल्या गोरगरिबांची उपासमार आता सहन करणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला.

संगमनेर दौर्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजप शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीष कानवडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस योगीराज परदेशी, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुंजाळ महाराज, रोहिदास कडलग महाराज, अध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष किरपाल डंक, सरचिटणीस वैभव लांडगे, विठ्ठल शिंदे, सीताराम मोहरीकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शैलेश पटांगरे, शहराध्यक्ष दीपेश ताटकर, राहुल भोईर, संतोष पठाडे, रोहिदास साबळे, किशोर गुप्ता, कमलाकर भालेकर व बहुसंख्य पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आचार्य भोसले म्हणाले, संगमनेर शहर व तालुक्यात ऐतिहासिक पंरपरा असलेले धार्मिक दर्जाचे अनेक मंदिरे आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार आहे. सरकारमध्ये प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघात संगमनेरकरांनी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली केली आहे. ठाकरे सरकारच्या तालिबानी नियमांना अक्षरशः तिलांजली दिली आहे. भाविकांना पवित्र असणार्या श्रावण महिन्यात मंदिरे पूजा-आरती व दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली. त्यानिमित्ताने संगमनेरकरांचे मनापासून अभिनंदन. राज्यातील जनतेला हुकूमशाही तालिबानी ठाकरे सरकारने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असताना देखील देवधर्म मंदिरात कडीकोंडा लावून बंदिस्त केले आहे ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही, हा सर्व एककलमी कार्यक्रम चालू आहे तो जनताच हाणून पाडेल अशी घणाघाती टीका केली.

दारु व्यवसायात महसूल जास्त मिळतो म्हणून दारुचे धंदे चालू आहे आणि मंदिरे बंद आहे. शिर्डी देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, येथे अनेक गोरगरीब, छोटे-मोठे व्यावसायिक पोट भरतात. पण त्याकडे तीन-तीन मंत्री असूनही दुर्लक्ष आहे. स्थानिक मंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष नाही. तर पालकमंत्री बाहेरचे आहे त्यांना लक्ष घालण्यासाठी वेळ नाही अशी वाईट अवस्था आहे. मंत्री मामा-भाचे यांचा डोळा शिर्डी संस्थानवर नियुक्ती होण्यासाठी आहे. पंरतु शिर्डीत लाखो गोरगरिबांची उपासमार होते याकडे त्यांचे लक्ष नाही. स्थानिक मंत्री लक्ष घालत नाही तेव्हा बाहेरचे असलेले पालकमंत्री तरी कशाला लक्ष घालतील असा टोला लगावत पालकमंत्री तर हरवले आहे काय असा प्रश्न नगरकरांना पडतो आहे. कोरोना काळातही चार-चार महिने फिरकत नाही ही शोकांतिका असल्याची कोपरखळीही भोसले यांनी शेवटी लगावली.
