तिघांविरोधात साडेचार हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत अपहार

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेतील ७ कोटी ३७ लाख ६२ हजार ७८ रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याविरोधात सुमारे साडेचार हजार पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.

सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये सहकारी संस्था राहुरी येथील लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेचे १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीचे फेरलेखापरीक्षण केले होते. यामध्ये निष्पन्न झालेल्या अहवाल व कागदोपत्री दस्तऐवजांवरून पतसंस्थेत ७ कोटी ३७ लाख ६२ हजार ७८ रूपये रकमेचा संस्थेचा विश्वासघात करून फसवणूक व अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे सहायक निबंधकांच्या आदेशाने धनवडे यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन व्यवस्थापक कारभारी फाटक (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी), अध्यक्ष भाऊसाहेब येवले (रा. नांदूर रस्ता, राहुरी), उपाध्यक्ष शरदराव निमसे (रा. अस्तगाव माथा, राहाता), लेखनिक सुनील भोंगळ (रा. भोंगळ वस्ती, जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी), उत्तम तारडे (रा. केंदळ, ता. राहुरी), सुरेखा सांगळे (रा. राहुरी), तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक सुरेश पवार (रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी) व दीपक बंगाळ (रा. राहाता) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून व्यवस्थापक फाटक, अध्यक्ष येवले व उपाध्यक्ष निमसे यांच्याविरूद्ध गुन्हे शाखेने सुमारे साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. येवले व निमसे अटकेत असून फाटक याला अटक करण्यात आली होती, तो सध्या जामिनावर बाहेर आहे. तर इतरांना देखील अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
