पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचा ‘मॉर्निंग’ धमाका! बसचालकावर पिस्तुल रोखणारा पुण्याचा ‘गोल्डमॅन’ पाठलाग करुन धरला..


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
धडक कारवाई करणारा दबंग अधिकारी म्हणून जिल्ह्यात लौकीक मिळवणार्‍या श्रीरामपूरच्या पोलीस उपअधीक्षकांनी पोलीस खात्याची मान उंचावणारी कारवाई केली आहे. या जलद आणि धडक कारवाईतून एरव्ही पोलिसांवर होणारा दिरंगाईचा आरोपही त्यांनी धुवून काढला आहे. या घटनेत औरंगाबादकडून शिर्डीच्या दिशेने येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भररस्त्यात रोखून चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवणार्‍या पुण्याच्या गोल्डमॅनला त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन धरले. सदरील बसमधून प्रवास करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याची समयसूचकता आणि पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचा तत्काळ प्रतिसाद पाहून या बसमधून प्रवास करणार्‍या 45 प्रवाशांना आनंदाचे भरते आले होते.


याबाबत श्रीरामपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टाकळीभान शिवारात घडली. बसचालक संजय गायकवाड हे आपल्या ताब्यातील औरंगाबाद आगाराची बस (एम.एच.40/बी.एल.4180) घेवून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. सदरील बस टाकळीभान शिवारातील वीटभट्टी समोर येताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मारुती स्वीफ्ट (क्र.एम.एच.16/ए.बी.4046) कारच्या चालकाने आपले वाहन आडवे घालून बसचालकाला बस उभी करण्यास भाग पाडले.


यावेळी आपल्या वाहनातून खाली उतरुन कारचालकाने आरेरावी करण्यास सुरुवात केली व क्षणात आपल्या कमरेला खोचलेले पिस्तुल काढून बसचालकावर रोखीत ‘माझ्या गाडीला कट का मारलास …..?’ असे म्हणत गोळ्या घालण्याची धमकी देवू लागला. अचानक उद्भवलेला हा प्रसंग पाहून बसमधून प्रवास करणार्‍या 45 प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. याच बसमध्ये पोलीस शिपाई विलास उकीर्डे हे देखील प्रवास करीत होते. समोर घडणारा प्रकार पाहून काहीतरी आक्रीत होणार असल्याचा अंदाज बांधून त्यांनी तत्काळ मोबाईलवरुन फोन करीत श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना घडत असलेला प्रकार आणि स्वीफ्ट वाहनाची माहिती दिली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उपअधीक्षक मिटके यांनी कोणताही विलंब न करता टाकळीभानच्या दिशेने धाव घेतली. यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या स्वीफ्ट कारवर त्यांचा संशय बळावल्याने त्यांच्या वाहनचालकाने लाईट दाखवून त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र आता ‘आपली’ खैर नाही हे लक्षात आलेल्या कारचालकाने त्यांना हुलकावणी देत तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. उपअधीक्षक मिटके यांनीही आता ‘तुझी’ खैर नाही म्हणत आपले वाहन पुन्हा वळवून त्याचा पाठलाग सुरु केला. जवळपास आठ-दहा किलो मीटरपर्यंत चाललेल्या या चोर-पोलिसांच्या खेळात अखेर पोलिसांची सरशी झाली आणि त्यांना स्वीफ्ट कार थांबवण्यात यश मिळाले.


सदरचे वाहन उभे करताच उपअधीक्षक मिटके यांनी वाहनचालकावर पिस्तुल रोखून त्याला वाहनातून बाहेर येण्यास सांगितले. तो बाहेर पडताच सोबतच्या पोलिसांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळीत वाहनात ठेवलेले पिस्तुल ताब्यात घेतले. वाहनासह त्याला श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर औरंगाबाद-शिर्डी या बसच्या चालकाला बोलावण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणार्‍या लक्ष्मण शिवाजी आरे (वय 32) याच्याविरोधात भा.द.वी.कलम 353, 341, 186, 504, 506 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले.


सदरील इसमाच्या गळ्यात सोनसाखळ्यांची मोठी लगड होती, त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता तो आपल्या परिसरात ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखला जात असल्याचे समोर आले. अतिशय थरारक पद्धतीने घडलेल्या या प्रसंगात बसमधून प्रवास करणार्‍या पोलीस शिपाई विलास उकीर्डे यांची समयसूचकता आणि पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बसचालकासह बसमधील 45 प्रवाशांचा टांगणीला लागलेला जीव अखेर भांड्यात पडला आणि सर्वांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

Visits: 10 Today: 1 Total: 82664

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *