विवाहित दादल्याचा तरुणीला फसवून विवाह आणि अत्याचार! पठारभागातील धक्कादायक प्रकार; आरोपी निघाला सराईत गुन्हेगार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून तालुयाच्या पठारभागातून धक्कायदायक वृत्तांची श्रृंखला समोर येत असून त्यात आज आणखी एका घटनेची भर पडली आहे. या घटनेत अवघ्या तीन महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने मामाच्या गावी आलेल्या १९ वर्षीय तरुणीला बळजोरीने पळवून नेत दोन दिवस तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तिसर्या दिवशी आरोपीने पीडितेला आळंदीत नेवून तिच्याशी लग्नही उरकले. मात्र नवरी मुलगी पहिल्यांदाच सासरी आल्यानंतर आपल्या दादल्याचे आधीच लग्न झाल्याचे ऐकून तिला धक्काच बसला आणि अखेर याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार आणि धमकावल्यावरुन आरोपी केशव बबन काळे याच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून सध्या तो मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात जुन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे. या वृत्ताने संपूर्ण तालुयात खळबळ उडाली असून मुलींच्या अनियंत्रित मोबाईल वापरातून काय घडू शकते याचे सर्वात मोठे उदाहरण उभे राहिले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ पठारभागात राहणारी एक १९ वर्षीय विद्यार्थीनी संगमनेरातील सह्याद्री महाविद्यालयात शिक्षण घेते. गेल्या एप्रिलमध्ये ती कुरकुंडी येथील आपल्या मामाच्या गावी गेलेली असताना ‘इन्स्टाग्राम’ या समाज माध्यमातील प्लॅटफॉर्मवर तिची केशव बबन काळे या तरुणाशी ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये चॅटींग व अधुनमधून संभाषण होत असताना गेल्या मंगळवारी (ता.११) आरोपी केशव काळे याने पीडितेला फोन करीत ‘जर तू माझ्यासोबत आली नाहीस, माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीही होवू देणार नाही’ अशी धमकी देत पीडितेला पिंपळगाव देपा फाट्यावर बोलावले आणि न आल्यास पीडितेच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर गेल्या शनिवारी (ता.१५) पीडित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता आरोपी केशव काळे आपल्या दुचाकीवरुन तेथे आला व पीडितेला उद्देशून ‘तू माझ्याबरोबर चल..’ असे दरडावताना बळजोरीने तिला आपल्या दुचाकीवर बसवून शिरापूर-संगमनेर-अकोले-ओतूर मार्गाने कबाडवाडी (ता.जुन्नर, जि.पुणे) येथे त्याच्या मामाच्या घरी घेवून गेला. शनिवार व रविवार असल्याने आरोपीने पीडितेसह दोन दिवस तेथेच थांबला व रात्री ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी जीवच देईल’ अशी धमकी देत दोन्ही दिवस तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सोमवारी (ता.१७) सकाळी त्याने पुन्हा लग्नाचा तगादा लावून जीव देण्याची धमकी देत कबाडवाडीतून (ता.जुन्नर) मोटारसायकलवर बसवून तिला आळंदीच्या दिशेने निघाले. यावेळी त्याच्यासोबत इतर मोटारसायकलवर त्याचे आई-चडील, मामा-मामी, मामाचा मुलगा व सून, मामाची मुलगी व तिचा नवरा असे आठ जणही होते.

या सर्वांनी आळंदी येथील अलंकापुरी विवाह संस्थेत दुपारी तीनच्या सुमारास पीडितेचा आरोपी केशव काळे याच्याशी विवाह लावून दिला. यावेळी आरोपीकडून संबंधित विवाह संस्थेने पूर्वी लग्न झाले नसल्याचे स्वप्रतिज्ञापत्रही लिहून घेतले. त्यानंतर ही सगळी मंडळी पुन्हा कबाडवाडीत आली. त्या दिवशीची रात्रही त्यांनी तेथेच घालवली व आरोपीने पीडितेशी पुन्हा शारीरिक संबंधही ठेवले. त्यानंतर दुसर्या दिवशी आरोपीने पीडितेसह आपले मूळगाव कुरकुंडी गाठले. यावेळी घरात असलेल्या त्याच्या आई-वडील व भाऊ-भावजयीची ओळख पटवत असताना केशव काळे याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झालेले असल्याची माहिती पीडितेला समजली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने आपल्या भावाशी संपर्क साधून त्याला घेण्यास येण्यास सांगितले, यावेळी आरोपीने पीडितेचा मोबाईल हिसकावून घेतला, जो अजूनही त्यांच्याच ताब्यात आहे.

त्यानंतर तासाभरातच पीडितेचे आई-वडील व भाऊ तेथे आले आणि त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेत पुन्हा आपले गाव गाठले. या सर्व घडामोडींमुळे मानसिक स्वास्थ ढासळलेल्या पीडितेने मंगळवारी (ता.२५) आपल्या आई-वडील व भावासह घारगाव पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्या कानावर घातला. त्यांनीही तत्काळ कारवाई करीत पीडितेचा जवाब नोंदवून आरोपी केशव बबन काळे (वय २३, रा.कुरकुंडी) याच्यावर भारतीय दंडसंहितेचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२, एन), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु केला. त्यातून सदरचा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे व तो सध्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात जुन्नर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. येत्या शुक्रवारी (ता.२८) त्याच्या कोठडीची मुदत संपणार असून त्यानंतर त्याला घारगाव पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.

कोविड संक्रमणाच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ शिक्षण प्रणालीमुळे सर्वच वर्गातील पालकांनी आपापल्या पाल्यांना मोबाईल संच विकत घेवून दिले. संक्रमणाचा कालावधी लोटल्यानंतर शिक्षण व्यवस्था पूर्ववत झाली, मात्र विद्यार्थ्यांच्या हाती आलेले मोबाईल तसेच राहिल्याने त्याचे दुष्परिणाम आता हळूहळू समोर यायला सुरुवात झाली आहे. समाज माध्यमात सहज ओळख झालेल्या व्यक्तीही कशाप्रकारच्या असतात आणि एकदा त्यांच्या जाळ्यात अडकल्यावर काय होते याचे सर्वात मोठे उदाहरण पठारावरील या घटनेतून समोर आले असून आतातरी पालकांनी दक्ष राहून आपला पाल्य तर अशा चक्रात अडकला नाही ना? याची वेळीच खातरजमा करण्याची वेळ आली आहे. या घटनेने तालुयात खळबळ उडाली असून लग्न झालेल्या मुलाचे पुन्हा लग्न लावून देण्यासाठी हजर राहिलेल्यांनाही कायद्याचा धाक दाखवण्याची मागणी होत आहे.

