निळवंडेचे पाणी जास्तीत जास्त क्षेत्राला मिळेल ः थोरात चिंचोली गुरव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जनतेच्या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरीता केला. निळवंडे धरण व कालव्यासाठी दररोज पाठपुरावा करून हे ऐतिहासिक काम पूर्ण केल्यानंतर कालव्यांद्वारे पाणी दुष्काळी भागात आले असून हे पाणी जास्तीत जास्त क्षेत्राला मिळेल, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर आमदार सत्यजीत तांबे, बाबा ओहोळ, महेंद्र गोडगे, शंकर खेमनर, संपत गोडगे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, अजय फटांगरे, बेबी थोरात, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, बाबजी कांदळकर, प्रभाकर कांदळकर, अनिल कांदळकर, तळेगावच्या सरपंच उषा दिघे, विलास सोनवणे, विलास अण्णा सोनवणे, सोमनाथ आभाळे, संगीता बर्डे, स्वप्नील गोडगे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे २५ कोटींच्या विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले आणि या प्रेमामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना तालुक्याचा देशभर सन्मान वाढवताना विकासाचा वेग कायम राखला. संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. चिंचोली गुरवची पाणी परिषद ही निळवंडे धरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून १९९९ ला निळवंडे धरणाचे काम खर्‍या अर्थाने सुरू झाले. २०१२ ला भिंतीचे काम पूर्ण झाले, याच कालावधीत मोठमोठ्या बोगद्यांचा कालव्यांची कामे मार्गी लागली होती. मात्र २०१४ ते १९ कामे थंडावली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येतात या कामाला अत्यंत गती दिली. या उन्हाळ्यामध्ये दहा टीएमसी पाणी धरणात शिल्लक होते. अशावेळी कालव्यांची चाचणी घेण्यासाठी सरकारला आग्रह केला. कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी आले. जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. मात्र हा आनंद काही लोकांना पाहवला नाही, त्यांनी तत्काळ पाणी बंद केले. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण व कालवे करून घेतले असून यापुढील काळ हा काँग्रेसचाच राहणार असून कोणीही या पाण्यापासून वंचित राहणार नाही असे सांगताना तालुक्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहे. मात्र दर्जेदार काम होण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून काम करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक विलास मास्तर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व स्वप्नील गोडगे यांनी केले तर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी आभार मानले.

Visits: 488 Today: 2 Total: 2128498

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *