चालकाच्या प्रसंगावधानाने चाळीस विद्यार्थी बचावले! चंदनापूरी घाटात थरकाप उडवणारी घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे घडला असता अनर्थ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण सर्वसामान्यांच्या जीवावर उठण्याची श्रृंखला आजही अखंडीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज सकाळी चंदनापूरी घाटाच्या पायथ्याशी रस्त्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक असलेल्या लेनवर भरधाव वेगाने निघालेल्या मालट्रकने दुसर्या वाहनाला ओलांडण्याच्या नादात समोरुन येणार्या स्कूलबसला कट मारला. अंगाचा थरकाप उडवणार्या काही क्षणांच्या या घटनेत दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होण्याची जवळजवळ शक्यता असताना बसचालकाने ऐनवेळी आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उतरवले, मात्र पावसामुळे साईडपट्ट्यांचा बट्ट्याबोळ झाल्याने तेथील माती खचून ते ड्रेनेजमध्ये कलांडले. या गडबडीत एकमेकांवर व सीटवर आदळल्याने पाच मुलांसह नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यावेळी स्कूल बसमध्ये चाळीस विद्यार्थी होते, चालकाने प्रसंगावधान दाखवून बस कडेला उतरवली नसती तर, आज तालुक्याला मोठा अनर्थ पहावा लागला असता. या घटनेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला, स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णायात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.4) सकाळी साडेआठच्या सुमारास चंदनापूरी घाटाच्या पायथ्याशी गाभणवाडीजवळ घडली. चंदनापूरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिकणार्या पठारावरील 40 मुला-मुलींना घेवून विजय दुधावडे हा कंत्राटी बसचालक घाट उतरत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या रामचंद्र अर्थ मूव्हर्स या ठेकेदाराकडून महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांना वेगावर मर्यादा ठेवून एकेरी वाहतूकीने प्रवास करावा लागतो. सध्या घाटाजवळही रस्त्याच्या कामामुळे दोन्ही दिशेने होणारी वाहतूक एकाच लेनवर वळवण्यात आली आहे.

पठारभागातील अनेक विद्यार्थी घाटाखालील चंदनापूरीच्या चंदनेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात. यासर्व मुलांना दररोज शाळेत नेण्या-आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीने स्कूलबसेस नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यातीलच एका कंत्राटदाराची बस (क्र.एम.एच.14/बी.ए.8932) घेवून विजय दुधावडे चाळीस विद्यार्थ्यांसह चंदनापूरी घाट उतरुन गाभणवाडीजवळ आला. सध्या घाटातील या भागात रस्त्याचे काम सुरु असल्याने पुणे आणि नाशिक अशी दोन्ही बाजूने होणारी वाहतूक एकाच बाजूने सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्याची परिस्थिती विचारात घेवूनच वाहने चालवणे आवश्यक आहे. एकीकडे रस्त्याची कामे सुरु असताना दुसरीकडे ठेकेदाराने दिशादर्शक फलक, रात्रीच्या अंधारात दिसतील अशा रेडिअमच्या खूणा लावण्यात अथवा एकेरी मार्गावर वाहनचालकांना योग्य दिशा दाखवण्यात, सर्व्हिस रस्त्यांची कामे पूर्ण करण्यापूर्वीच काँक्रीटीकरण करुन हलगर्जीपणा केल्याने या रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अपघात घडून निष्पापांना आपला बळीही द्यावा लागला आहे.

आजही असाच बाकाप्रसंग उभा होताहोता राहीला. सुदैवाने ऐनवेळी काळाची झडप चुकावी असा थरकाप उडवणारा प्रसंग घडला, मात्र तो अनर्थाशिवाय टळला. गाभणवाडीजवळील वळणावर चाळीस विद्यार्थ्यांना घेवून चंदनेश्वर विद्यालयाची स्कूलबस घाट उतरत असताना अचानक नाशिकच्या बाजूने पुण्याकडे निघालेला भरधाव वेगातील मालट्रक दुसर्या वाहनाला ओलांडण्याची स्पर्धा करीत समोर आला. एकाबाजूला चिखलमय साईडपट्टी आणि लागलीच खोलवर ओबडधोबड ड्रेनेज तर, दुसर्या बाजूला थेट येणार्या मालट्रकशी समोरासमोर धडक असे दोनच पर्याय चालक विजय दुधावडेच्या समोर होते. या भयंकर दृष्याने काहीक्षण काळाचाही थरकाप व्हावा अशा घटनेत साक्षात पांडूरंग उभा राहीला आणि बसचालकाने क्षणात दुसरा पर्याय निवडून बसचे चाक खाली उतरवले आणि धडकेचे रुपांतर कट बसण्यात होवून भरधाव मालट्रक तसाच निर्विकार निघूनही गेला.

घटनेच्यावेळी बसमध्ये चाळीस विद्यार्थी होते. सध्या पाऊसही सुरु असल्याने या भागातील साईडपट्ट्याही अतिशय कमकुवत झाल्या आहेत, त्याचा प्रत्यय या घटनेतही आला. रस्त्याच्या खाली उतरताच साईडपट्टीची माती खचल्याने बस थेट कडेच्या ड्रेनेजकडे घसरत गेली आणि डोंगराच्या बाजूला कलंडली. विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी चालकाने सुरुवातीला करचटून ब्रेस मारला आणि नंतर बस ड्रेनेजच्या दिशेने घसरत जावून डोंगराला आदळली. या गदारोळात विद्यार्थी एकमेकांवर आदळले, काहींची डोकी सीटवर अथवा खिडक्यांवर आदळली, काहींना नियंत्रण ठेवता आले नाही, त्यामुळे ते सीटपासून बाजूला फेकले गेले. ही घटना घडताच गाभणवाडी व परिसरातील नागरीकांसह रस्त्याने जाणार्या काही वाहनांनी थांबून तत्काळ घटनास्थळावर धाव घेत सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

या घटनेत पाच मुलांसह चार मुली अशा एकूण नऊ विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या असून घाटातील गुंजाळ इन्स्टिट्यूटमध्ये प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना सोडण्यात आले आहे. एकीकडे राज्यभरातून ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत असंख्य पालख्या पंढरीत दाखल होण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे संगमनेरात त्याच्या उत्साहावर विरजन घालू पाहणारी घटना घडू पाहत असताना साक्षात पांडूरंगानेच उभे राहून काळाला माघारी पाठवले आणि आषाढीच्या दोन दिवस अगोदर होवू पाहणारा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलीस उपाधिक्षक कुणाल सोनवणे यांच्यासह तालुका निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट देत जखमी विद्यार्थ्यांचीही विचारपूस केली. बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळल्याबद्दल विजय दुधावडेचे कौतुकही केले गेले.

असंख्य त्रुटी मागे ठेवून 2017 साली सुरु झालेल्या ‘सिन्नर ते खेड’ या नूतन पुणे-नाशिक महामार्गावर गेल्या आठ वर्षात असंख्य अपघात घडून शेकडो निष्पाप प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सदरचा रस्ता पूर्ण करताना झालेल्या करारानुसार ठरलेल्या ठिकाणी उपरस्ते (सर्व्हिसरोड), उड्डाण अथवा भूयारी पादचारी मार्ग, प्राण्यांना रस्ता ओलांडण्याच्या जागा, वृक्षारोपण अशी कितीतरी कामे आजही अर्धवटच आहेत. त्याचा फटका सामान्य प्रवाशांचे बळी जाण्यात होत आहे, मात्र त्या उपरांतही ठेकेदारांच्या मानसिकतेमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. या घटनेतही राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एकेरी करताना पाळायचे आवश्यक नियम पायदळी तुडवल्यानेच बाका प्रसंग उभा राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारालाही अशा घटनांमध्ये सहआरोपी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

