मोकळ्या जागांवर नशा करण्यासाठी जाल तर खबरदार! पोलिसांचे छापासत्र; नदी किनारे, मैदानांवर दारु रिचवणार्‍यांची धावपळ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ दारुविक्री दुकानातून स्वस्तात मद्याची बाटली घेवून सार्वजनिक मैदानं, नदीकाठ अथवा मोकळ्या जागी बसून नशा करणार्‍यांची आता खैर नाही. गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलिसांनी अशाप्रकारची ठिकाणं लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून दोन दिवसांत पंचवीसहून अधिक तळीरामांना कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे. सदरची कारवाई यापुढेही नियमीतपणे सुरु राहणार असून नशेसाठी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करणार्‍यांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील विविध तरतुदींनुसार दोषींवर गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईने नशेबहाद्दरांचे धाबे दणाणले असून पोलिसांचे वाहन दिसतात अशा ठिकाणांवर मद्य शौकिनांची धावपळ बघायला मिळत आहे.

मागील काही वर्षात मद्याच्या किरकोळ दुकानामधून स्वस्तात दारुच्या बाटल्या विकत घेवून हवेशीर कोठेतरी मोकळ्या मैदानात, जागेत, म्हाळुंगी अथवा प्रवरा नदीच्या काठावर बसून ती रिचवणार्‍यांची मोठी संख्या तयार झाली आहे. त्यातच गांजा व लपूनछपून सिगारेट ओढणार्‍यांचीही त्यात भर पडल्याने शहरालगतच्या अथवा शहरातील आडवळणावर असलेल्या अशा ठिकाणांवर नशेबहाद्दरांसह तरुणांची मोठी रेलचेल दिसत असते. बर्‍याचवेळा नशेत झिंगलेल्या अशा व्यक्ती अथवा समूहाकडून महिलांची छेडछाड काढण्यासह सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याचेही प्रकार घडले आहेत.

अशा गोष्टी टाळता याव्यात व शहरातील गुन्हेगारी घटनांवरही पूर्णतः नियंत्रण निर्माण व्हावे यासाठी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहर व परिसरातील अशा सर्व संशयित ठिकाणांवर थेट धाडी घालून नशा करताना आढळणार्‍या प्रत्येकावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १८५, ८४, ८५ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी सहाय्यक निरीक्षक राजेंद्र पवार, उपनिरीक्षक निवांत जाधव व बारकू जाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार केली असून त्यांच्याकडून शहरातील विविध ठिकाणी छापे घातले जात आहेत. त्यात शनिवारपासून सुरु झालेल्या या धडक मोहिमेत गेल्या दोनच दिवसांत पंचवीसहून अधिक मद्य शौकिनांना पोलीस ठाण्याची वारी घडवण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. छाप्यात अडकलेले अनेकजण पोलिसांकडे गयावया करण्यासह आपल्या ओळखीच्या राजकीय पुढार्‍यांना सोडवण्याचे साकडे घालीत असल्याचे, मात्र पोलीस कोणाचेही ऐकत नसल्याचेही चित्र सध्या बघायला मिळत आहे. या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *