पठारभागातील अल्पवयीन मुलींवर संगमनेरात अत्याचार! अवघे साडेचौदा वर्षांचे वय; घारगाव पोलिसांकडून आरोपीला तत्काळ अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चारच दिवसांपूर्वी अवघ्या साडेबारा वर्ष वयाच्या चिमुरडीवर नराधमाकडून अत्याचार झाल्याच्या वृत्ताने जनमानसात संताप उसळला असतांना आता सुसंस्कृत म्हणून शेखी मिरवणार्या संगमनेरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. यावेळी ओळखीचा गैरफायदा घेत पठारवरील एका नराधमाने अवघ्या साडेचौदा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस फसवून संगमनेरातील एका हॉटेलमध्ये आणून बळजोरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. शनिवारी दिवसा घडलेल्या या प्रकाराची पहाटे नोंद होताच घारगाव पोलिसांनी अत्याचार करुन घरात निर्धास्त झोपलेल्या शेंडेवाडीतील गणेश सुखदेव भंडागे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शनिवारी (ता.22) सकाळी घडला. पठारभागात राहणारी एक 14 वर्ष सात महिने वयाची अल्पवयीन मुलगी नजीकच्या गावातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यासाठी ती दररोज आपल्या गावच्या फाट्यावर उभी राहून मिळेल त्या वाहनाने शाळेत जात. त्यातून पंधरा दिवसांपूर्वी पठारावरील शेंडेवाडीत राहणारा गणेश सुखदेव भडांगे (वय 21) हा आपल्या दुचाकीवरुन पीडित मुलीच्या गावाजवळून जात असतांना पीडितेने ‘लिफ्ट’ देेण्यासाठी हात केला. त्यातून शाळेपर्यंतच्या प्रवासात ओळख झाल्याने भडांगे याने आपल्या मनातील कावा साधून तिला आपला मोबाईल क्रमांक दिला व कोणतीही अडचण असल्यास आपल्याला सांग असे म्हणत तो निघून गेला.
प्रत्येक घटनेत मुलींचा घात करण्यात कारणीभूत असलेला मोबाईल क्रमांक येताच त्यांच्यात संदेशाचे देवाण-घेवाण व गप्पाही होवू लागल्या. त्यामुळे पोरंगी फसली असे समजून गणेश भडांगे याने शनिवारी सकाळी 9 वाजता पीडितेला तिच्या गावाच्या फाट्यावरुन नजीकच्या त्या शाळेत सोडले. त्यानंतर त्याने दीडतासाने सकाळी साडेदहा वाजता पुन्हा शाळेच्या आवारात येवून तिला बोलावून घेतले व आपण बाळेश्वरच्या दर्शनाला जावू असे सांगत तिला आपल्या दुचाकीवर बसवून तो तेथून निघाला.
प्रत्यक्षात त्याने बाळेश्वरकडे न जाता पीडितेला संगमनेरात आणून एका हॉटेलमधील खोलीत नेले. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्याला वारंवार विरोध केल्याने वासनांध झालेल्या भडांगे याने तिला मारहाण करीत तुशांत राहीली नाहीस तर मी तुझ्यासह तुझ्या कुटुंबातील सर्वांना ठार मारील असा दमही त्याने भरला. त्यामुळे घाबारलेल्या पीडितेने त्याचा अत्याचार सहन केला. मनात हैवान जागलेल्या त्या नराधमाच्या मनातील वासना शमल्यानंतर दुपार तीनच्या सुमारास त्याने पुन्हा संगमनेरातून ‘त्या’ शाळेत जावून साडेचार वाजता पीडितेला शाळेजवळ सोडले व तो निघून गेला.
या सगळ्या प्रकाराने घाबरलेली ती लहानशी मुलगी घरी गेल्यानंतर तिने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यातून तिचे अख्खे कुटुंब हादरले. अखेर मध्यरात्री त्यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन करीत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी गणेश सुखदेव भडांगे (वय 21, रा.शेंडेवाडी) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 363, 376 (3), 323, 504, 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 4, 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत आरोपीच्या तत्काळ मुसक्या आवळल्या. त्याला आज (ता.23) न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची (ता.26) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत. या वृत्ताने पठारभागात एकच खळबळ उडाली आहे.