राहाता पालिकेच्या मुख्याधिकार्यांना धक्काबुक्की दुकान बंद करण्यास सांगितल्याचा राग; तिघांविरुद्ध गुन्हा

नायक वृत्तसेवा, राहाता
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जाणार्या अधिकार्यांवर हल्ले होण्याच्या घटनाही पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. राहाता येथे रात्री नऊनंतर दुकान बंद करून गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकार्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानही सील करण्यात आले आहे.

राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार रात्री 9 नंतर जमावबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी शहरातील दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे रात्री नऊनंतर नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक साठे, मोहन गाडेकर, आनंद लाठे यांना सोबत घेऊन आम्ही गस्त घालत होतो. राहाता ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेले हर्षल मेन्स पार्लर दुकान सुरू होते. तेथे पाचपेक्षा जास्त लोक होते. त्यामुळे त्यांना येथे गर्दी करू नका, असं सांगून दुकानही बंद करण्यास सांगितलं. याचा राग आल्याने तेथील लोकांनी मुख्याधिकार्यांनाच दमबाजी केली. आम्ही याच गावातील राहणारे आहोत. तुम्ही बाहेरून येऊन आम्हांला दम देता का? आम्ही इथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी दमबाजी त्या लोकांनी केली. त्यांची समजूत काढत असताना पोपट रघुनाथ जाधव, निसार सय्यद उर्फ राज्जू भाई, सिद्धार्थ वाघमारे यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस आल्याचं पाहून काही लोक पळून गेले. तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुकानही सील करण्यात आलं आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसर्या लाटेवेळीही पोलीस आणि प्रशानातील अधिकार्यांवर याच कारणातून हल्ले होण्याच्या काही घटना घडल्या होत्या. आता निर्बंध कडक करून त्यांची अंमलबजावणी सुरू झाल्याने पुन्हा तशाच घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा तिसरी लाट पुन्हा धोका वाढवू शकते.
