एकाच आरोपीकडून चार दिवसांत दुसर्‍यांदा विनयभंग! घुलेवाडीतील प्रकार; यावेळी चौघा आरोपींचा गुन्ह्यात समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाड्याने घेतलेले घर खाली करुन घेण्यासाठी कोण कोणत्या पातळीपर्यंत खाली घसरते याचे चित्र दाखवणारा प्रकार पुन्हा एकदा घुलेवाडीत घडला आहे. अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दुसर्‍यांदा घडलेल्या या प्रकारातील फिर्यादी महिला एकच असून यावेळी आरोपींची संख्या मात्र एकवरुन चारवर गेली आहे. या चौघांनीही फिर्यादीच्या घरात शिरुन पीडितेच्या पतीला मारहाण करीत विनयभंग केला आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची नोंद त्याच दिवशी मध्यरात्री झाली असून शहर पोलिसांनी चौघांविरोधात विनयभंगासह मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडी शिवारातील एका उच्चभ्रु वसाहतीत बाळासाहेब लक्ष्मण कल्हापूरे (हल्ली रा.पुणे) यांचा बंगला असून तो एका दाम्पत्याला भाड्याने देण्यात आला आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून संबंधित घरमालकाने आपला बंगला खाली करुन द्यावा यासाठी भाडेकर्‍याकडे एकसारखा तगादा लावला असून त्यातून त्याच्याकडून तब्बल दोनवेळा विनयभंगाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गेल्या मंगळवारी (ता.4) त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्याच्यासह इतर तिघांवर आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.


या घटनेत शनिवारी (ता.8) सायंकाळी सहाच्या सुमारास सदरील भाडेकरी दाम्पत्य आपल्या ताब्यातील बंगल्याचे प्रवेशद्वार उघडून आंत जात असतांना तेथे आलेल्या चौघांनी ‘आमचे घर खाली करा!’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी या चौघांनीही पीडितेच्या पतीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून पीडित महिला पतीला वाचवण्यासाठी धावली असता आरोपी प्रदीप रहाणे व सुदामा मुखेकर यांनी ‘त्या’ महिलेचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.


तर, घरमालकाचा मुलगा विकास कल्हापूरे याने पीडित महिलेचे दोन्ही हात पकडले. यावेळी त्यांचे पती त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्या सर्वांनी ‘आमचे घर खाली करुन द्या, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना जीवे ठार मारुन टाकू’ अशाप्रकरची धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या त्या दाम्पत्याने त्यानंतर रात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विकास कल्हापूरे, प्रदीप रहाणे, सुदामा मुखेकर व बाळासाहेब लख्मण कल्हापूरे या चौघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 354, 354 (ब)ख 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या मंगळवारी (ता.4) बाळासाहेब कल्हापूरे यांनी पीडित महिलेचा पती घरी नसतांना त्यांच्या घरात जावून घर खाली करण्याबाबत दमबाजी केली होती. यावेळी आरोपीने पीडितेचा विनयभंग करीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पीडितेच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरोधात विनयभंगासह शिवीागळ व दमबाजी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानंतर चारच दिवसांत पुन्हा तसाच प्रकार घडला असून यावेळी मात्र पूर्वीच्या आरोपीसह अन्य तिघांचाही त्यात समावेश झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *