संगमनेरात महिलांसाठी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वूमेन्स लिग’; क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याची संधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगासनांच्या प्रचार-प्रसाराच्या कार्याचा भाग म्हणून देशभरात राबविल्या जाणार्या वेगवेगळ्या उपक्रमात महिलांसाठी होणार्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे विशेष आकर्षण असते. या स्पर्धांची घोषणा झाली असून येत्या २४ व २५ डिसेंबर रोजी संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात त्या पार पडणार आहेत. महिलांच्या दोन वयोगटात होणारी ही स्पर्धा योगासनांच्या चार प्रकारांमध्ये होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याचीही संधी मिळेल अशी माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. या स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वूमेन्स लिग’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी १२ ते १८ आणि १८ ते ५५ असे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. योगासनांच्या पारंपरिक, कलात्मक एकल, कलात्मक दुहेरी व तालात्मक दुहेरी अशा चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणार्या स्पर्धकाला पुढील महिन्यात जबलपूर येथे होणार्या क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याची संधीही मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्या महिलांचा गट ३१ मार्च २०२३ रोजी पूर्ण होणार्या वयानुसार ठरवला जाईल. स्पर्धक कलात्मक गट वगळता केवळ एकाच प्रकारात भाग घेवू शकतील. राज्यपातळीवर होत असलेल्या या स्पर्धेतून पाच स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी केली जाईल. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना पदक आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा येत्या रविवार २४ व सोमवार २५ डिसेंबर रोजी संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्या महिलांनी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या संकेतस्थळावर जावून नाव नोंदणी करावी असे आवाहन स्पर्धेचे तांत्रिक संचालक सतीश मोहगावकर व असोसिएशनचे सचिव राजेश पवार यांनी केले आहे.
