रतनवाडी, घाटघरसह मुळा खोर्यात पावसाचा जोर वाढला! भंडारदर्यात हंगामातील विक्रमी आवक; मुळा नदीनेही किनारे व्यापले

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या आठवड्यापासून पाणलोटात काहीशा मंदावलेल्या पावसाला गुरुवारी सकाळपासून पुन्हा जोर चढला आहे. सायंकाळ होताहोता कळसूबाईच्या शिखरांवरील जलधारा आटल्या मात्र भंडारदर्याच्या पाणलोटातील रतनवाडी व घाटघरमध्ये संततधार टिकून राहिल्याने आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत धरणात 440 दशलक्ष घनफूटाचा विक्रमी जलसाठा जमा झाला आहे. भंडारदर्यासह मुळा धरणाच्या पाणलोटातही पावसाने जोर धरला असून चालू हंगामात पहिल्यांदाच मुळा नदीने साडेसात हजारांहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह धारण केला आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठाही वेगाने पुढे सरकू लागला आहे. तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसाला पुन्हा जोर चढला असला तरी पूर्वेकडील आढळा खोरे मात्र अद्यापही ढगाकडे डोळे लावून बसले आहे. गेल्या दीड महिन्यांत या धरणात थेंबभरही पाण्याची आवक झाली नसल्याने लाभक्षेत्रात चिंताही निर्माण झाली आहे.

एरव्ही जुलैमध्ये जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांना झोडपून काढणारा पाऊस यंदा मात्र अद्यापही कोसळला नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यात दीर्घकाळ पाऊस लांबला होता. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची मागणीही जेमतेमच राहिल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही धरणांमध्ये समाधानकारक शिल्लक साठा होता. त्याचा परिणाम यावर्षी अद्यापही फारसा जोर नसतानाही भंडारदरा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणातही 46 टक्के पाणी जमा झाले आहे. कळसूबाईच्या शिखरांची स्थितीही जेमतेम पावसाची राहिल्याने यंदा अपवाद वगळता कृष्णवंती दुथडी होण्याचे प्रमाणही ओघानेच अनुभवायला मिळाले आहे. मात्र असे असले तरीही भंडारदर्यातून सोडल्या जाणार्या विद्युत निर्मितीच्या पाण्यातून दररोज धरणात 71 दशलक्ष घनफूट पाणी दाखल होत आहे, त्यामुळे जेमतेम पावसातही निळवंडे धरणाचा जलसाठा हलता आहे.

गेल्या पंधरवड्यात पाणलोटात परलेल्या पावसाचा जोर अवघ्या आठवड्यातच मंदावला. एकीकडे राज्यातील काही भागात तुफान जलवृष्टी होत असतानाही दुसरीकडे धरणांचे पाणलोट मात्र रिमझिम पावसाने ओले होवू लागल्याने काहीशा चिंताही निर्माण झाल्या होत्या. परंतु गुरुवारी (ता.20) आश्लेषा नक्षत्राच्या पूर्वार्धातच भंडारदर्याच्या पाणलोटातील रतनवाडी व घाटघरमध्ये पावसाचा जोर वाढला. त्यामुळे दिवसभरात ताशी 26 दशलक्ष घनफूट वेगाने अवघ्या 12 तासांतच भंडारदर्यात 307 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. या कालावधीतच मुळा व कृष्णवंतीच्या खोर्यातील पावसाचा वेगही वाढल्याने दुपारी वाकी जलाशयावरील पाण्याची गती 556 क्युसेकपर्यंत वाढली. मात्र सायंकाळनंतर एकूणच पावसाचा जोर पुन्हा कमी झाल्याने धरणाकडे झेपावणार्या ओढ्या-नाल्यांनाही मरगळ आल्याचे बघायला मिळाले.

मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावरील पावसाची गती मात्र कायम असून धुवाँधार जलधारा कोसळत आहेत. त्यामुळे चालू हंगामात पहिल्यांदाच मुळानदी दुथडी झाली असून आज सकाळी 6 वाजता कोतुळजवळील मुळा पात्रातून 7 हजार 667 क्यूसेक इतका उच्चांकी प्रवाह वाहत होता. त्याचा परिणाम मुळा धरणातील पाणीसाठ्यावर झाला असून 24 तासांत धरणात 309 दशलक्ष घनफूट पाणी वाढल्याने धरणाचा जलसाठा आता 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाला कमी-अधिक जोर चढत असतांना पूर्वेकडील आढळा खोरे मात्र अद्यापही तहानलेलेच आहे. या धरणाच्या डोक्यावरील पाडोशी व सांगवीचे लघु पाटबंधारे प्रकल्पही अद्याप भरले नसल्याने व त्यातच या संपूर्ण भागात पावसाचे प्रमाणही तुरळक असल्याने पावसाळा सुरु झाल्यापासूनच्या गेल्या दीड महिन्यात आढळा धरणात नव्या पाण्याचा थेंबही जमा झालेला नाही. त्यामुळे आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे खिळल्या आहेत.

गेल्या 24 तासांत रतनवाडीत सर्वाधिक 130 मि.मी., घाटघर 116 मि.मी., भंडारदरा 97 मि.मी., वाकी 67 मि.मी., पांजरे 50 मि.मी. व निळवंडे येथे अवघा 2 मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. सध्या भंडारदरा धरणातून विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी 840 क्युसेकने पाणी सोडले जात असून त्यातून 24 तासांत 71 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे, तर 369 दशलक्ष घनफूट पाणी धरणात अडवले गेले आहे. मुळा धरणात 309 तर निळवंडे धरणात 123 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. सध्या कोतुळजवळील मुळा नदीतून 7 हजार 667 क्यूसेक तर कृष्णवंतीवरील वाकी जलाशयातून 197 क्यूसेकने पाणी वाहत आहे. सकाळी 6 वाजता मुळाधरणात 11 हजार 848 दशलक्ष घनफूट (45.56 टक्के), भंडारदरा 8 हजार 199 (74.27 टक्के), निळवंडे 2 हजार 983 दशलक्ष घनफूट (35.82 टक्के) व आढळा धरणात 537 दशलक्ष घनफूट (50.66 टक्के) इतका पाणीसाठा आहे.

पर्यटकांची रेलचेल वाढली!
पावसाळ्यात भंडारदरा धरणाचे पाणलोट म्हणजे साक्षात स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणारे ठिकाण भासते. भरगच्च हिरवा शालू पांघरलेले सह्याद्रीचे उंचच उंच कडे, त्यावरुन फेसाळत खळाळणारे जलप्रपात, गच्च भरलेली भात खाचरे आणि त्यात इर्ले पांघरुन काम करणारे आदिवासी बायाबापडे, निसर्गाने नटलेला भंडारदर्याचा पाणलोट परिसर, अधुनमधून झाकोळून टाकणारे धुके आणि सोबतीला बोचणारा गारवा यामुळे पावसाळ्यात या परिसरात पर्यटकांची मोठी रेलचेल असते. गुरुवारपासून पावसाला पुन्हा जोर चढल्याने शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे भंडारदर्यात पर्यटकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असून येथील हॉटेल व्यावसायिक त्यासाठी सज्ज झाले आहेत.
