जी – ट्वेंटी परिषदेला पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी केले संबोधित ‘विषमुक्त भारत-सशक्त भारत’चा व्यासपीठावरून दिला नारा

नायक वृत्तसेवा, अकोले
गुजरातमधील आनंद येथे नुकतीच जी-20 परिषद पार पडली. जगभरातील सुमारे 17 देशांतील सदस्यांनी या परिषदेसाठी सहभाग नोंदवला होता. या परिषदेमध्ये अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या खास निमंत्रित होत्या. वूमन्स ट्वेंटी म्हणून आयोजित परिषदेमध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरेंना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद (एन. डी. डी. बी.) तसेच पशु व दुग्धविकास मंत्रालय भारत सरकार, फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन यूनायटेड स्टेट, गुजरात सहकारी दूध वितरण संघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन गुजरात राज्यातील आनंद येथे करण्यात आलेले होते. या परिषदेसाठी विविध देशांतून तसेच भारतातील अनेक प्रांतातून महिला उद्योजक व दुग्ध विकास सहकारी संस्थांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. जनभागीदारी या सदराखाली घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रातून पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर मिसाईल वूमेन टेसी थॉमस, आंतरराष्ट्रीय खेळाडू लज्जा गोस्वामी, वूमन्स ट्वेंटी परिषद आनंद अध्यक्षा डॉ. संध्या पुरेच्या, मुख्य समन्वयक धरित्री पटनायक आदी उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी विषमुक्त भारत-सशक्त भारत या विषयाचा नारा दिला. विषमुक्त शेती करायची असेल तर गावरान बियाण्यांचे संवर्धन प्रत्येक गावाने व शेतकर्यांनी केले पाहिजे. प्रत्येक गावात गावरान बियांची शेतकर्यांच्या सहभागाने बँक तयार व्हावी. यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक शेतकर्याच्या बांधावर गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मी शाळा शिकू शकले नाही. परंतु निसर्गाच्या शाळेत मी भरपूर शिकले असल्यानेच मला मार्गदर्शनासाठी बोलावले जात असल्याचेही आवर्जुन नमूद केले. या दौर्याचे नियोजन बायफ संस्थेचे अतिरिक्त राज्य समन्वयक जितीन साठे यांनी केले होते. अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी व्यवस्थापक दादाभाऊ सावंत यांनी परिषदेसाठी आलेल्या विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन अकोले तालुक्यातील शेतकर्यांसाठी बायोगॅस, सेंद्रीय खत निर्मिती, शेतीसाठी लागणारे जैविक औषधे निर्मिती यांसारख्या उपक्रमांना दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन घेतले. या दौर्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड मुंबईच्या स्वाती श्रीवास्तव यांनी विशेष सहकार्य केले.
