निराधार गर्भवतीची ‘आधार’कडून माऊली प्रतिष्ठानमध्ये व्यवस्था आधारबरोबर शहर पोलिसांनी देखील घडविले संवेदनशीलतेचे दर्शन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरात गेल्या वीस दिवसांपासून एक निराधार मनोरुग्ण महिला मिळेल ते मागून आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र, समाज किती विकृत होत आहे याचे मोठं उदाहरणही यानिमित्ताने पहायला मिळाले होते. दरम्यान, निराधारांसाठी सदैव ‘आधार’ ठरलेल्या आधार फाउंडेशनने याची गंभीर दखल घेऊन पोलिसांच्या मदतीने महिलेची माऊली प्रतिष्ठान (शिंगवे, अहमदनगर) येथे व्यवस्था करण्याचे ठरविले. त्यानुसार योजना आखून पीडित गर्भवती माऊलीला रुग्णवाहिकेद्वारे रवाना केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, संगमनेर शहरात एक 30-35 वर्षे वयाची निराधार मनोरुग्ण महिला रस्त्यावर फिरत होती. यातील धक्कादायक वास्तव म्हणजे त्या महिलेवर कृतघ्न पाशवी प्रवृत्तीच्या अनेकांनी अत्याचार केल्याची कहाणी तिने सांगितली. परंतु, याचा तिच्या मनावर खोल आघात झाला असून ती भीतीने स्वतःचे नाव सांगत नाही. तर गावाचे नाव कधी मालेगाव, गंगाखेड तर कधी आळेफाटा असे सांगते. कधीकधी कुणाला शिव्या देते, तर कुणी तिच्या जवळ चौकशीसाठी गेले तर भीतीपोटी दगडं मारायची. दरम्यान, निराधारांसाठी सदैव ‘आधार’ ठरणार्या आधार फाउंडेशनचे समन्वयक सोमनाथ मदने यांना ही माहिती डॉ.किशोर पोखरकर यांच्याकडून मिळताच त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी चर्चा केली. त्यावर महिलेची व्यवस्था माऊली प्रतिष्ठान (शिंगवे, अहमदनगर) येथे करण्याचे ठरविले.
त्यानंतर योजना आखून निराधार मनोरुग्ण महिला विद्यानगर परिसरात आढळून आल्यानंतर माऊली प्रतिष्ठानचे डॉ.राजेंद्र धामणे यांच्याशी आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने यांच्यामार्फत संपर्क करण्यात आला. मात्र, ती महिला एका जागेवर थांबत नसल्याने तिचा शोध घेणे मोठे जिकिरीचे झाले होते. शहरातील पोलीस यंत्रणा, आधार शिलेदार गेल्या आठ दिवसांपासून तिचा शोध घेत होते. बर्याच मित्रांकडे संपर्क क्रमांक देऊन अशी महिला आढळून आल्यास तात्काळ संपर्क करण्यास सांगितले होते.
त्यानंतर बुधवारी (ता.2) ती महिला संगमनेर महाविद्यालयाच्या समोर थांबलेली असल्याचे समजले. त्यावर आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ताबडतोब महिला पोलिसांसह पथकास पाचारण केले. अखेर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेची शिंगवे येथे रवानगी केली. याप्रसंगी आधारचे समन्वयक पी. डी. सोनवणे, आधारचे शिलेदार माजी सैनिक लक्ष्मण ढोले, पोलीस कॉन्स्टेबल शीतल तोरकडी, अमृत आढाव, अक्षय देशमुख, श्री.आजबे, श्री.गोरे आदी उपस्थित होते.
मनोरुग्ण महिला गर्भवती असून, दिवस भरत आल्याने रस्त्यावर कुठेही कधीही प्रसूती झाली तर खूप हाल झाले असते. परंतु, आधार फाउंडेशन व शहर पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे तिला आता माऊली प्रतिष्ठानच्या इंद्रधनू प्रकल्पात सुरक्षितता मिळणार आहे. तर मध्यंतरीच्या काळात सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी स्वतः मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या गर्भवती माऊलीला घुलेवाडी येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी नेले होते. परंतु, उपचारांनंतर महिला हुलकावणी देत निघून जायची.