दाढ खुर्द परिसरात बिबट्याचा पुन्हा वृद्ध व्यक्तीवर हल्ला स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले वृद्धाचे प्राण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील दाढ खुर्द परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्या व मानवाचा यांचा संघर्ष वाढला असून मागील पंधरा दिवसांत चार ते पाचवेळा परिसरात बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाले आहेत. शुक्रवारी (ता.21) सकाळी बिबट्याने रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्धावर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे दाढ खुर्द परिसरातील बिबटे आता ‘उदंड’ झाले असल्याची भावना स्थानिक नागरिकांची झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून पोपट उर्फ रामा कारभारी पर्वत (वय 65) हे वृद्ध नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी 6.15 वाजता घराकडून व्यवसायानिमित्त गिरणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडूपात शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्यांना झुडूपात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पर्वत यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे त्यांचा आवाज ऐकून किशोर जोशी व नारायण शिंगोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान दाखवत बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे वृद्धाची बिबट्याच्या जबड्यातून मुक्तता झाली. अन्यथा मोठा बाका प्रसंग ओढवला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

यावेळी स्थानिकांच्या मदतीने मुलगा संजय पर्वत व पुतणे विकास पर्वत यांनी दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात जखमी वृद्धावर प्राथमिक उपचार करुन अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे. तर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानतंर वन विभागाने काही दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावला खरा पण बिबट्यासाठी कोणतेही भक्ष्य पिंजर्‍यात न ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांतील हल्ल्याच्या घटना पाहता मानव व बिबटे यांच्यातील संघर्ष तीव्र होण्यापूर्वी वनविभागाने वरिष्ठ पातळीवर अधिकार्‍यांशी चर्चा करुन या परिसरात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच सतीष जोशी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, नारायण शिंगोरे, विलास पर्वत, संजय पर्वत, रामदास जोशी, संपत जोशी, आकाश जोशी, संदीप झनान, बाबासाहेब शिंगोरे, सुनील जोशी, सुरेश जोरी, दगडू साळवे, मनोहर जोशी आदिंसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक हरिश्चंद्र जोजार, बी. सी. चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून आणखी दोन पिंजरे येथे लावणार असल्याचे सांगितले.

Visits: 22 Today: 1 Total: 115181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *