संगमनेरातील विधिज्ञाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न! चोरीची तक्रार केल्याचा राग; सातजणांनी केला तिघांवर जीवघेणा हल्ला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सात महिन्यांपूर्वी घरात झालेल्या चोरीची पोलिसांमध्ये तक्रार केल्याच्या कारणावरुन संगमनेरातील सातजणांनी हातात कोयता, लोखंडी गज, बर्फ फोडण्याचा टोचा आणि बेसबॉल खेळण्याचा लाकडी दांडा घेवून सुकेवाडी रस्त्यावर राहणार्या विधिज्ञावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या दोघा भावांवरही हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मच्छी सर्कलजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आज पहाटे पोलिसांनी विधीज्ञ शरीफखान पठाण यांच्या तक्रारीवरून सात जणांवर घातकशस्त्रांसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, या घटनेनंतर हल्लेखोर मात्र पसार झाले आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी (ता.१५) भूमि अभिलेख कार्यालयाजवळील मच्छी सर्कल परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेले विधीज्ञ शरीफखान रशिदखान पठाण (वय ४७, रा.माताडे मळा, सुकेवाडी रोड) यांच्या घरी सात महिन्यांपूर्वी ११ मे रोजी चोरीची घटना घडली होती. त्यावेळी त्यांनी चोरीच्या प्रकारामागे सादिक रज्जाक शेख व त्याच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला. तेव्हापासून सादिक शेखसह त्याचे अन्य नातेवाईक फिर्याद मागे घेण्यासाठी शरीफखान पठाण यांच्याशी सातत्याने वाद घालून त्यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करीत होते.

मागील सात महिन्यांपासून सतत सुरु असलेल्या या वादावादीचे पर्यावसान शुक्रवारी (ता.१५) सकाळी अकराच्या सुमारास अधिक ठळकपणे उमटले. यावेळी मुख्य आरोपीसह त्याच्या नातेवाईकांनी विधीज्ञ पठाण यांना गाठून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांनी दिलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी व आरोपींच्या घराजवळील पठाण यांच्या घराचे प्रवेशद्वार काढून घ्यावे यासाठी या सर्वांनी त्यांना दमदाटी, धमक्या व शिवीगाळही केली. त्यावरुन पठाण यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद केली. त्यानंतर हे प्रकार थांबतील असे वाटत असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सादिक शेख याचा साकूरमध्ये राहणारा जावई अश्पाक पटेल हा सासरवाडीत आला आणि फिर्यादी शरीफखान पठाण यांच्या घरात आवाज जाईल अशा पद्धतीने ‘याला जिवंत का सोडले?’ असा प्रश्न करीत ‘संध्याकाळपर्यंत त्याचा कायमचा कार्यक्रम करण्याची’ भाषा करु लागला.

सादिक शेखच्या जावयाने दुपारी दिलेली धमकी खरी करताना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते सर्वजण मच्छी सर्कलजवळ मुख्य आरोपीचा मुलगा आयान सादिक शेख याच्या मच्छी विक्रीच्या दुकानाजवळ दबा धरुन बसले. नेहमीप्रमाणे विधीज्ञ शरीफखान रशिदखान पठाण आपल्या कार्यालयातून माताडेमळा येथील घराकडे जात असताना शेरु इमाम शेख या मासे विक्रेत्याने त्यांना हाक मारली म्हणून ते त्याच्या दुकानाजवळ गेले. यावेळी तेथे असलेल्या अन्य दोघा-तिघांशी ते गप्पा मारीत असतानाच अचानक सादिक शेख आपल्या साथीदारांसह तेथे अवतरला आणि त्याने आपल्या हातातील कोयत्याने विधीज्ञ पठाण यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच त्यांनी तो चुकविल्याने सदरचा वार त्यांच्या डोक्याला चाटून गेला. तर, उर्वरीत आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी आणि लोखंडी गज आणि बेसबॉलच्या दांड्याने मारायला सुरुवात केली.

हा प्रकार सुरु असताना विधीज्ञ पठाण यांचे भाऊ रिजवान आणि आसिफ दोघेही समोर असलेल्या हॉटेलच्या बाहेर उभे होते. त्यांनी मारहाणीचा हा प्रकार पाहताच आपल्या भावाला वाचवण्यासाठी दोघेही शेरु शेख यांच्या दुकानासमोर धावले. त्यांना पाहून सादिक शेख याने ‘दरवेळी हे दोघे याला वाचवायला येतात, यांनाही सोडू नका..’ असे म्हणताच कदीर नूरमुहम्मद शेख याने आपल्या हातातील बर्फ फोडण्याचा टोचा रिजवान पठाण यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपला हात मध्ये घातल्याने त्यांच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली. त्याचवेळी आरोपीचा मुलगा आयान शेख याने मासे कापण्याचा कोयता घेत त्यांच्यावर वार केला, तो त्यांच्या कानावर लागल्याने क्षणात रिजवान पठाण रक्तबंबाळ झाले.

या दरम्यान जमावातील इम्रान बशीर शेख व जुनेद सादिक शेख या दोघांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने विधीज्ञ पठाण यांचा लहान भाऊ आसिफ याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सादिक शेख याचा जावई अश्पाक इब्राहिम पटेल याने ‘यातील एकालाही सोडू नका’ असे म्हणत मारहाण करणार्यांना चिथावणी दिली. हा सगळा प्रकार सुरु असताना तेथे मोठी गर्दी जमल्याने पुढील अनर्थ पाहता त्यातील काहींनी या हाणामार्यात घुसून विधीज्ञ शरीफखान पठाण, त्यांचे भाऊ रिजवान व आसिफ यांना त्यांच्या तावडीतून सोडवले. या मारहाणीत रिजवान व आसिफ या दोघांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी विधीज्ञ शरीफखान पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी सादिक रज्जाक शेख याच्यासह आयान सादिक शेख, इम्रान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज सादिक शेख, कदीर नूरमुहम्मद शेख (सर्व रा.माताडे मळा, सुकेवाडी रोड) व अश्पाक इब्राहिम पटेल (रा.साकूर ) या सात जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम ३०७ सह भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाण करणारे सातही आरोपी घटनेनंतर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करीत आहेत.

‘एकतर चोर वरती शिरजोर’ या उक्तीप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी फिर्यादीला तक्रार मागे घेण्याच्या धमक्या देत अखेर त्यांचा जीवच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अडचणीच्या जागा विकत घेणे, धाकपडदशा दाखवून जागा बळकावणे, खाली करणे, अतिक्रमण करुन दादागिरी करणे अशा प्रकारचे उद्योग करीत असल्याची चर्चा आहे. तर त्याचा जावई अश्पाक पटेल हा देखील अशाच प्रकारचा व्यवसाय करीत असल्याची व साकूरमध्ये नाल्यावर अतिक्रमण करुन त्याने इमारत बांधल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे.

