राज्याच्या कलाविश्वात संगमनेरच्या ‘काका-पुतण्याचा’ धुमाकूळ! ‘फुटला गं बाई फुटला..’ या राजकीय विडंबन गीताने ओलांडला पन्नास लाखांचा आकडा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हल्ली आपल्यातील प्रतिभा थेट जगाच्या रंगमंचावर मांडण्यासाठी सोशल माध्यम नावाची सहज आणि सुलभ व्यवस्था उपलब्ध आहे. फक्त त्याचे ज्ञान आणि त्याचा सकारात्मक वापर या दोन गोष्टी जुळवता आल्या पाहिजेत. संगमनेरच्या देशपांडे काका-पुतण्याने मात्र ही किमया साधली. वर्षभरापूर्वी शिवसेनेत जे घडलं, नुकतेचं त्याची पुनरावृत्ती राष्ट्रवादीतही बघायला मिळाली. पळवापळवीच्या या राजकारणातून अनेकांना मानसिक धक्का बसला, तर अनेकांनी घसरलेल्या राजकीय पातळीवर त्रागा करण्यासही सुरुवात केली. मात्र कवी मनाच्या मुरारी देशपांडे यांनी या घडामोडींना विडंबनाचा शाब्दीक साज चढवला आणि त्यांचा पुतण्या सर्वेश याने त्याला स्वरांचे कोंदण लेवून अस्थिर राजकीय स्थितीतही राज्याच्या जनतेला खळखळून हसवले. संगमनेरच्या काका-पुतण्याचा हा प्रयोग सोशल माध्यमांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारा ठरला. ‘फुटला गं बाई फुटला..’ आणि ‘सतरंज्या उचलू पुन्हा..’ या दोन विडंबन गीतांनी गेल्या दहा-बारा दिवसांतच शहर, राज्य आणि देशाच्या सिमा ओलांडून पन्नास लाखांहून अधिक मराठी मनांना अस्थिर राजकीय अवस्थेतही पोट दुखोस्तोवर हसवले.

संगमनेरचा सांस्कृतिक वारसा तसा प्रचंड प्रगल्भ आहे. कधीकाळी ‘बिकट वाट वहिवाट नसावी..’ असा अजरामर फटका लिहून ‘पदरचा पैका दे पर बाबा जामिन कोणाला होवू नको..’ असा मौलीक सल्ला देणार्या कवी अनंत फंदींच्या या भूमीत त्यांच्यानंतरही अनेक लेखक, साहित्यिक आणि कलाकार निपजले आणि त्यांनी फंदींचा सांस्कृतिक वारसाही तितक्याच जोरकसपणे पुढे नेला. काळ बदलत गेला, मात्र येथील प्रगल्भता कधीही आटली नाही. त्याचा प्रत्यय लेखक, गीतकार आणि कवी म्हणून परिचित असलेले मुरारी देशपांडे आणि वेगवेगळ्या कला आत्मसात करण्यासह गायकीचा छंद असलेला त्यांचा पुतण्या सर्वेश यांच्या सोशल माध्यमात सध्या प्रचंड व्हायरल होत असलेल्या दोन विडंबन गाण्यातून महाराष्ट्राला आला आहे.

चालू महिन्यातील 2 जुलैरोजी राज्यात राजकीय भुकंप व्हावा याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अर्थात राज्याला हा प्रसंग तसा नवा नव्हताच, कारण वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनीही अशाच पद्धतीने चाळीस शिलेदारांना सोबत घेत शिवसेनेची शकलं उडवली होती, अजित पवारांनी त्याचीच पुनरावृत्ती केली. त्यावरुन राज्यातील राजकारणात सुरु झालेली अनपेक्षित पळवापळवी आणि प्रचंड घसरलेला नैतिक राजकीयस्तर याच्या चर्चा आणि आगपाखड सुरु झालेली असताना वात्रटिकांच्या माध्यमातून राजकीय भाष्य करणार्या कवी मुरारी देशपांडे यांच्या कवीमनाला मात्र त्यातल्या विडंबनाचे दर्शन घडले, जे त्यांनी लेखणीच्या माध्यमातून कागदावर उतरवले.

हा कागद जेव्हा त्यांचे पुतणे सर्वेश देशपांडे यांच्या हातात पोहोचला तेव्हा नकळत त्यांची बोटं हामोर्निअमच्या पट्ट्यांवरुन फिरु लागली आणि काही वेळातच काका मुरारी देशपांडे यांच्या शब्दस्वरुपाला संगीताचा साज चढला. त्यातून स्वरबद्ध झालेली ‘फुटला गं बाई फुटला..’ आणि ‘सतरंज्या उचलू पुन्हा..’ ही दोन विडंबन गीतं जन्माला आली आणि ती सोशल समूहातील फेसबुक, यु-ट्यूब आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हजारों लोकांच्या हाती पडली. बघताबघता संगमनेरच्या काका-पुतण्यांचा हा कलाविष्कार शहर आणि तालुक्याच्या मर्यादा ओलांडून थेट मंत्रालयातही पोहोचला आणि तेथून राज्याच्या सिमा पार करीत जगात जेथे कोठे मराठी माणसं राहतात तेथे जावून थबकला. गेल्या दहा-बारा दिवसांतच जगभरात धुमाकूळ घालणार्या या दोन्ही विडंबन गीतांनी संगमनेरातून सोशल माध्यमात शेअर झालेल्या कोणत्याही गोष्टीचे विक्रम मोडीत काढले आणि आजच्या स्थितीत जगभरातील 50 लाखांहून अधिक लोकांनी डोलत ऐकल्याचा बहुमानही प्राप्त केला. या गीताने संगमनेरचे नाव विश्वभरात गेले असून काका-पुतण्यांच्या या प्रयोगाचे भरभरुन कौतुकही होत आहे.
माहितीस्तव : श्री. मुरारी देशपांडे, 9822082497 / 9850415744

