जातीय तेढ निर्माण करणार्या ‘पोस्ट’मुळे शेवगाव बंद! दोघांवर गुन्हा दाखल; एकाला पोलिसांनी केली अटक
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शहरात रविवारी (ता.12) रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्यानंतर तणाव निवळला. मात्र, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (ता.13) शेवगावमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
दोन युवकांनी सोशल नेटवर्किंग साइटवर छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबासोबत तुलना करणारा मजकूर टाकल्यामुळे शेवगाव शहरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या शिवभक्तांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रांगणात मोठी गर्दी केली. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी भूमिका त्यांनी घेतली. नागरिकांचा संताप पाहता शेजारील तालुक्यातील पोलीस पथक येथे दाखल झाले. शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यातील एक युवक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पथकासह शेवगावमध्ये दाखल झाले. याप्रकरणी साईनाथ कचरदास आधाट (रा. माळीवाडा, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वातावरण निवळले. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात आले आहे. तर दुसर्याला अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शेवगावमध्ये बंद पुकारण्यात आला असून सर्व शिवप्रेमी संघटनांकडून शेवगाव बंदची हाक देण्यात आल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी 10 वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित आले. त्यानंतर येथून क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यादिवशी दहावीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांना तसेच मढी यात्रेला निघालेल्या भाविक-भक्तांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली.