चार हजारांहून अधिक केसेसमधून तेरा लाखांची दंड वसुली! तरीही संगमनेरातील भटक्यांची संख्या कमी होण्याचे नाव घेईना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून संगमनेर शहर पोलिसांनी कोविड नियमांचे उल्लंघन करणार्या 4 हजार 165 जणांवर विविध कारणास्तव कारवाया करताना तब्बल 12 लाख 77 हजार 700 रुपयांची दंड वसुली केली. या दरम्यान मुंबई पोलीस अधिनियमाचा वापर करुन 115 उपद्रवी मूल्यांना ताब्यात घेवून त्यांना सोडण्यात आले. तरीही रस्त्यावरील गर्दी मागे हटली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांनी मात्र नागरिक धास्तावल्याचे चित्र दिसत असून जे दंडात्मक कारवाईने सिद्ध झाले नाही ते अँटीजेनच्या काडीने करुन दाखवले असे म्हणायची वेळ आली आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळली. त्यापूर्वी अचानक कोविड नियमांमध्ये दिली गेलेली सुट आणि राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसह अन्य कार्यक्रमांचा आलेला महापूर यामुळे लोकांना कोविडचा विसर पडला. त्याचा परिणाम गेल्या तीन महिन्यात जिल्ह्याने घेतलाच आहे. संक्रमणात अचानक वाढ झाल्याने शासनाकडून एकामागून एक आदेशांची रीघच लागली आणि प्रशासनातील सर्वच विभागांची धावपळही वाढली. कायदा व सुव्यवस्थेसह कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य विभागांसह पोलिसांची भूमिकाही यात अत्यंत महत्त्वाची ठरवली गेली आणि अगदी लग्न सोहळ्यातील उपस्थिती नियंत्रणात आणण्याचे कामही पोलिसांवरच सोपविण्यात आले. गेल्या जवळपास साडेचार महिन्यांपासून पोलीस दल शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशांची अंमलबजावणी करीत आहे. राज्यभर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाया होवून लाखोंची दंड वसुली करुनही रस्त्यांवरील गर्दीत फारसा फरक पडला नव्हता, मात्र गेल्या चार दिवसांपासून कारवायांसह आता रॅपिड चाचण्याही सुरू झाल्याने जे दंडात्मक कारवाईने साधले नव्हते, ते रॅपिड अँटीजेनच्या काडीने साधले आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मागील साडेचार महिन्यात संगमनेर शहर पोलिसांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष करणार्या सात मंगल कार्यालये अथवा लॉन्सवर कारवाई करतांना 70 हजार रुपये दंडाची वसुली केली. तर शहरातील विविध चौकात तपासणी नाके उभारुन विना मुखपट्टी फिरणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारताना तब्बल 3 हजार 960 कारवायांमधून 8 लाख 12 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा अस्वच्छता निर्माण करणार्या 198 जणांनाही कायद्याचा हिसका दाखवण्यात येवून त्यांच्यावर कोपटातंर्गत कारवाई करीत 3 लाख 95 हजारांचा दंड वसुल केला गेला. कोपटातंर्गत सर्वाधिक 142 कारवाया एकट्या मार्चमध्ये करण्यात आल्या, तर चालू महिन्यात एकही कारवाई झालेली नाही.
1 जानेवारीपासून कालच्या बुधवारपर्यंत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना मास्क, कोपटा व मंगल कार्यालय अथवा दुकानदारांवरील कारवायांची एकूण संख्या 4 हजार 165 असून त्यातून पोलिसांनी 12 लाख 77 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय मुंबई पोलीस अधिनियमांचा वापर करीत पोलिसांनी समाजातील विध्वंसक प्रवृत्ती असलेल्या 115 जणांना अधिनियमाच्या कलम 68 अन्वये ताब्यात घेवून 69 अन्वये त्यांची सुटका केली. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाया होवूनही शहरातील रस्त्यांवर फिरणार्या भटक्यांची संख्या नियंत्रणात आली नाही. मात्र गेल्या गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारुन 426 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली, त्यातून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात धाडण्यात आले.
रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करुन त्यातून कोणी पॉझिटिव्ह असल्यास त्याला तत्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे संगमनेरात काटेकोर पालन केले गेल्याने त्याचा परिणाम मागील तीन दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर दिसू लागला असून अँटीजेनच्या कांडीचा धसका घेवून अनेकजण धास्तावले आहेत. त्यामुळे बाहेर फिरणार्या भटक्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून रॅपिड अँटीजेनसह वरीलप्रमाणे कारवाई सुरुच असून अँटीजेन निगेटिव्ह आलेल्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडून नये असे आवाहनही प्रशासनाकउून करण्यात आले आहे.
जवळपास एक लाख लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणार्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसपासची बारा गावेही येतात. त्यामुळे शहरातील सुव्यवस्थेसह पोलिसांना ग्रामीण भागातील हालचालींवरही लक्ष ठेवावे लागते. त्या अनुषंगाने पोलिसांनी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसुरक्षा समिती सदस्य, तलाठी, होमगार्डस यांच्या मदतीने टास्क फोर्स तयार करुन गावातही यात्रा-जत्रांसह होणारे इतर धार्मिक, सार्वजनिक अथवा खासगी कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.