डोंगरगावच्या आधुनिक गाडगेबाबांची ‘स्वच्छतेची वारी’! डोंगरगाव ते पंढरपूर वारीतून करताहेत स्वच्छतेचे प्रबोधन

महेश पगारे, अकोले
अवघ्या जगाला स्वच्छतेचा संदेश देणार्‍या संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आणि कृतीचा प्रसार करणारे अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील आधुनिक गाडगेबाबा हरीभाऊ उगले हे आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’ वारी करत आहे. या माध्यमातून ते स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश देत आहेत.

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आणि वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले आधुनिक गाडगेबाबा म्हणून ओळख मिळालेले हरीभाऊ उगले यांनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा त्यांच्या मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यादृष्टीनेच ते राज्यभर स्वखर्चाने फिरत असून स्वच्छतेचा संदेश देत आहे. आता देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची भेट स्वच्छतेच्या वारीतून घेण्यासाठी प्रवास सुरू केला आहे. डोंगरगाव ते पंढरपूर अशी त्यांची मोटारसायकलवरून वारी सुरू आहे. गाडीला गाडगेबाबा यांच्यासारखे सर्व स्वच्छतेचे झाडू, बादली असे साहित्य बांधलेले आहे. तर गाडीच्या पाठीमागे ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’ आणि त्यांचे नाव व संपर्क क्रमांक असलेला फलक लावलेला आहे.

या स्वच्छतेच्या वारीतून मार्गावरील गावांत स्वच्छता करत आहे. तेथील शाळा व विद्यालयात जावून विद्यार्थ्यांनाही स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच नागरिकांशी देखील चर्चा करुन स्वच्छतेला प्राधान्य द्या, पाणी अडवा, झाडे लावा असे आवाहन करत आहे. दरम्यान, दरवर्षी पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर गाठतात. यातील वारकर्‍यांची अनेक व्यक्ती, सेवाभावी संस्था मनोभावे सेवा करतात. डॉक्टरही मोफत उपचार करतात. त्याचप्रमाणे आधुनिक गाडगेबाबा असलेले हरीभाऊ उगले हे देखील ‘वारी स्वच्छतेची, माझ्या पांडुरंगाची’मधून मनोभावे सेवा करत आहे.


कोरोना संकटात स्वच्छता आणि झाडांचे महत्त्व अधोरेखीत झालेले आहे. याचबरोबर वाढते जागतिक तापमान देखील चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यासाठी आधुनिक गाडगेबाबा असलेल्या हरीभाऊ उगले यांच्यासारखे आचरण करण्याची गरज आहे. तीच यानिमित्ताने पंढरपूरची वारी होईल.

Visits: 13 Today: 1 Total: 115515

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *