नवउद्योजक महिलांसाठी आनंदमेळा मैलाचा दगड ठरेल ः मालपाणी संगमनेरातील फनफेअरला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लायन्स क्लब ऑफ संगमनेर व माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळाने संयुक्तपणे केलेले फनफेअरचे आयोजन नवउद्योजक महिलांना प्रेरणादायी असून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी हा मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन संगमनेर येथील शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा मालपाणी यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संगमनेरमध्ये भंडारी मंगल कार्यालयात लायन्स क्लब ऑफ संगमनेर व माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळ यांनी एकत्र येऊन 6 व 7 मार्च, 2022 रोजी फनफेअरचे आयोजन केले त्याचे उद्घाटन सुवर्णा मालपाणी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, संगमनेर हे विकासाभिमुख शहर असून 30 ते 35 वर्षांपूर्वी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पुणे मुंबईला जावे लागायचे. महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध नव्हत्या आता परिस्थिती बदलली असून सर्व प्रकारचे उद्योगधंदे व शैक्षणिक संस्था संगमनेरमध्ये प्रगती करीत आहेत. यात महिला सुध्दा आघाडीवर असून नागरिकांनी आपली खरेदी-विक्री संगमनेरमध्येच केल्यास संगमनेरकरांचा उद्योग व्यवसाय नक्कीच भरभराटीस येईल.

यावेळी परफेक्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता कोडे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सुनीता पगडाल, माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला नावंदर, माहेश्वरी सिनिअर मंडळाच्या अध्यक्षा कल्पना मालपाणी व्यासपीठावर उपस्थित होत्या. फनफेअरमध्ये रियल व इमिटेशन ज्वेलरी, डिझायनिंग साडी, ड्रेस व ड्रेस मटेरियल, विविध खाद्य पदार्थ, गेम्स, हस्तकलेच्या वस्तू आदिंचे सुमारे 25 स्टॉलस उभारण्यात आले असून उद्घाटनाच्या पहिल्या तासांतच सुमारे 300 नागरिकांनी भेट देऊन उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख कीर्ती नावंदर व पूनम राजपाल यांनी दिली. शुभारंभ कार्यक्रमास लायन्स क्लबचे झोन चेअरमन श्रीनिवास पगडाल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रियंका गायकवाड, उद्योजक अशोक उदावंत, प्रतिथयश उद्योजक श्रीनिवास भंडारी, माजी उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा, डॉ. अबोली गांधी, केदारनाथ राठी, राजेश लाहोटी, स्वप्नाली तापडे, शिल्पा नावंदर, बबिता आसावा, स्वाती नावंदर, वासंती ठाकूर, संगीता उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Visits: 149 Today: 2 Total: 1104770

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *