दरोड्याच्या तयारीत असलेली ‘बृहन्नलांची’ टोळी पकडली! संगमनेर पोलिसांची कारवाई; तरुणीच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांची बारकाईने नोंद घेतल्यास काय घडू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण संगमनेरातून समोर आले आहे. या घटनेत बृहन्नलाच्या वेशात (महिलांच्या) दुकानात घुसलेल्या व्यक्तींवर संशय आल्याने एका तरुणीने 112 क्रमांकावर केलेल्या फोनमुळे तब्बल सहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. महिलांचा वेश परिधान करुन भर रस्त्यात वाहने अडवून त्यांना लुटणार्या या टोळीकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी सतर्क झालेली होती. त्यामुळेे गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टू प्लसमधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलिंग करणे अशाप्रकारच्या समांतर कारवाई चालू होत्या. परंतु पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नसलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.

दरम्यान, गुरुवारी (ता.13) चार वाजेच्या वाजण्याच्या सुमारास पावबाकी रोड येथे नाकाबंदीवेळी एक संशयित चारचाकी वाहन हे हुलकावणी देवून पळून जावू लागले असता सदर वाहनाचा पाठलाग करून पकडले. त्यातील संजय मारुती शिंदे (वय 25, रा. चिसखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि बुलढाणा), सुनील बाबुराव सावंत (वय 32, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), राजेश शंकर शेगर (वय 25, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), साजन शिवलाल चव्हाण (वय 25, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि किशोर महादेव इंगळे (वय 21, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव जि. बुलढाणा) हे साड्या घालून गाड्या लुटण्याचे तयारीत होते. त्यांच्याकडील लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, चारचाकी वाहन, लोंखडी कडे, साडी, मिरची पूड व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 83 हजार 150 रुपयांचे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांवर संगमनेर शहर पोलिसांत गुरनं. 577/2023 भा. दं. वि. कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहेकॉ. विजय खाडे, पोना.विजय पवार, पोकॉ.विशाल कर्पे, रोहिदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार यांनी केली असून पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहे.

‘बृहन्नला कोण होता?’
महाभारतात इंद्र दरबारातील अप्सरा उर्वशीच्या शापाने धनुर्धर अर्जुन एक वर्षांसाठी नपुंसक बनला होता. या कालावधीत पांडवांनी आपली ओळख लपवून राजा विराट याच्या विराटनगरीत आश्रय घेतला होता. तर, शापाने नपुंसक झालेला अर्जुन आपली ओळख लपवून विराटराजाची कन्या उत्तरा हिला संगीताचे प्रशिक्षण देत होता. त्यावेळी त्याला षंंढक बृहन्नला या नावाने ओळखले जात. संगमनेर शहर पोलिसांनी पकडलेली टोळीही अशाच प्रकारे स्त्री वेश धारण करुन बृहन्नलाची भूमिका वठवित असल्याचे समोर आले आहे. त्यांनी या भूमिकेतून किती जणांना गंडवले हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
