‘एटीएम’ फोडणारी आंतरजिल्हा टोळी पकडली! स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; संगमनेरातील दोघा आरोपींचा समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन दिवसांपूर्वी भिंगार कँम्प पोलिसांच्या हद्दितील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम लुटीच्या तपासात जिल्हा गुन्हे शाखेच्या हाती मोठे घबाड लागले आहे. राहुरीतून नगरच्या दिशेने सुसाट धावणार्या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या जागीच मुसक्या आवळीत अन्य दोघांना घरातून जेरबंद केले आहे. या चौघांच्याही प्राथमिक तपासातून जवळपास 27 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यात संगमनेर शहरातील एकासह खांडगावमधील एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 18 लाख 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. गेल्याकाही वर्षात जिल्ह्यात संगमनेरसह काही ठिकाणी एटीएम फोडीच्या अनेक घटना घडल्या, मात्र त्यांचा तपास लागला नाही. आता मोठ्या कालावधीनंतर पोलिसांच्या हाती गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम फोडणारी टोळी लागल्याने अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या रविवारी (ता.9) भिंगार कँम्प पोलीस ठाण्याच्या हद्दितील वाकोडीफाटा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भिंगार कँम्पसह स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहे यांनी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करुन या प्रकरणाचा तपास हाती घेतला. वाकोडीफाटा येथील एटीएम फाडण्यात एका रुपेरी रंगाच्या कारचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचा सगळा तपास त्या कारवर केंद्रीत झाला.

सदरील आरोपींच्या वर्णनावरुन गुन्हे शाखेचे पथक राहुतील अभिलेखावर असलेल्या आरोपींचा शोध घेत असतांना नगर-मनमाड महामार्गावरुन संशयीत वाहनाच्या वर्णनाची कार गेल्याचे पथकाला दिसले. यावेळी पथकाने त्या वाहनाचा पाठलाग करीत निरीक्षक आहेर यांना त्याची माहिती दिली. त्यांनीही शेवटपर्यंत पाठलाग करण्याचे आदेश देत नगरहून राहुरीच्या दिशेने दुसरे पथक रवाना करीत असल्याची माहिती दिली. सदरील चोरटे विळदघाटातून बायपास रस्त्याने निघाले असता पोलिसांच्या दोन्ही वाहनांनी त्याला रस्त्यातच अडवून आरोपींवर पिस्तुल रोखले. अगदी सिनेस्टाईल थरार झालेल्या या प्रसंगात वाहनातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाच्या तपासणीत एटीएम फोडण्यासाठी लागणारी सगळी अवजारे, सिलेंडर, कटर असा मुद्देमाल आढळून आला.

यावेळी त्यांना इतर साथीदारांची नावे विचारली असता त्यांनी कोपरगाव तालुक्यातील दोघांची नावे सांगितली. त्यानुसार कोपरगाव पोलिसांच्या मदतीने त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या प्राथमिक चौकशीतून त्यांनी भिंगार, राहुरी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड अशा अनेक जिल्ह्यात चोर्या केल्याचे आढळून आले. यातील संगमनेर शहरातील पंम्पिंग स्टेशन परिसरात राहणारा कुख्यात आरोपी अजित उर्फ कमळ्या अरुण ठोसर (वय 22) याच्या विरोधात एकट्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 11 गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यासोबत वाहनात पकडलेला जमीर जाफर पठाण (वय 21) हा आरोपीही संगमनेर तालुक्यातील खांडगावचा रहिवाशी आहे.

या दोघांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरुन कोपरगाव तालुक्यातील खडकी येथून पकडलेल्या रवींद्र वाल्मीक चव्हाण (वय 32) व शुभम पोपटराव मंजुळे (वय 25) यांना अटक करण्यात आली. यातील चव्हाण याच्यावर कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नगर तालुका, शिऊर, वैजापूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 16 गुन्ह्यांची नोंद आहे. या चारही आरोपींच्या ताब्यातून दोन महिंद्रा ट्रॅक्टर, एक स्वीफ्ट कार, एक बुलेट व एक पल्सर व चोरीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 18 लाख 16 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला केला आहे. या टोळीकडून आत्तापर्यंत सहा गुन्हे उघड झाले असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

या महत्त्वपूर्ण कामगिरीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, स्वाती भोर, अनिल कातकाडे, उपअधीक्षक संदीप मिटके, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, बबन खरे, चालक संभाजी कोतकर अरुण मोरे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, संदीप दरंदले, भिमराज खर्से, गणेश भिंगारदिवे, फुरकान शेख, ज्ञानेश्वर शिंदे पोलीस शिपाई सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळु गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचा मोलाचा वाटा होता.

