निळा जनआक्रोश मोर्चा कायद्याच्या कचाट्यात! जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग; पदाधिकार्यांसह सव्वाशे जणांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबई व नांदेड येथील घटनांच्या अनुषंगाने देशभरात मागासवर्गीय समुदायावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या शनिवारी संगमनेरात निळा जनआक्र्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात 17 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्या उपरांतही विविध मागासवर्गीय संघटनांनी हा मोर्चा काढल्याने आता तो कायद्याच्या कचाट्यात अडकला असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोर्चाच्या आयोजकांसह सुमारे सव्वाशे जणांवर संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही कालावधीत देशभरात मागासवर्गीय समुदायावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगत संगमनेर तालुक्यातील विविध मागासवर्गीय समुदायांच्या नागरिकांचा समावेश असलेला ‘निळा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (ता.8) सकाळी साडेदहाच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनावर धडकलेल्या या मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिकार्यांसह अनेक नागरिकही सहभागी झाले होते. या मोर्चासाठी आयोजकांनी पोलीस प्रशासनाकडून परवानगीही मागितली होती. मात्र गेल्या 4 जुलैपासून 17 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये वरील कालावधीत सभा, मोर्चे, आंदोलने यासारख्या गोष्टींना मनाई असल्याने पोलिसांनी सदरील मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्या उपरांतही या मोर्चाचे आयोजन केले गेले व त्यात मोठ्या संख्येने माणसं जमविली गेली. या घटनेनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी कायद्याचे हत्यार उपसले असून विनापरवानगी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यावरुन पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्यावरुन 135 प्रमाणे किशोर सुदामराव चव्हाण (रा.दिल्लीनाका), आशिष प्रभाकर शेळके (रा.उंबरी बाळापूर), अॅड.किरण सुधाकर रोहम (रा.पिंपरणे), प्रवीण देवेंद्र गायकवाड (रा.समनापूर), राजू यादव खरात, रवी अरुण गिरी (दोघेही रा.घुलेवाडी), बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड (रा.वडगाव पान), शशिकांत विनायक दारोळे (ढोलेवाडी), संदीप भाऊ मोकळ (रा.पारेगाव), रामदास दादू दारोळे (रा.राजवाडा), कैलास राजाराम कासार (रा.देवाचा मळा), पप्पू उर्फ आकाश अर्जुन गोडगे (रा.इंदिरानगर), माणिक दाजीबा यादव (रा.जोर्वे), रामदास सुराळकर (रा.राजापूर), दीपक रणशेवरे, अजीज वोहरा व किशोर दादू वाघमारे (तिघेही रा.संगमनेर), संध्या खरे (रा.अकोले नाका), विजय वाकचौरे (रा.अकोले), मंजाबापू साहेबराव साळवे (रा.जाखुरी), सुनील रमेश रुपवते (रा.माधव चित्र मंदिराजवळ) या 21 जणांसह अज्ञात शंभर ते सव्वाशे जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
