‘सतरा’ वर्षाच्या मुलीचा ‘दुप्पट’ वयाच्या अधेडाशी विवाह! उडानसह पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला; संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बालविवाह रोखण्यासाठी कितीही जनजागृती केली अथवा कठोर कायदे अंमलात आणले तरीही राज्यात अजुनही अल्पवयीन मुलींचे लग्नं लावण्याचे प्रकार घडतच आहेत. असाच धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील पठारभागातूनही समोर आला असून अवघ्या सतरा वर्ष वयाच्या मुलीचा विवाह तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या अधेडाशी लावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र याबाबत कोणीतरी अज्ञाताने स्नेहालयाच्या ‘उडान’ कक्षासह पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर त्याची माहिती दिल्याने तालुक्यात होवू पाहणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. यावेळी पथकासह विवाहस्थळी पोहोचलेल्या घारगाव पोलिसांनी दोन्ही कुटुंबाकडून कायद्याचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घेत त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा दिला. या घटनेतून राज्यातील काही भागात आजही बाल विवाहाबाबत जागृती नसल्याचे चित्रही दिसून आले.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील एका गावात गुरुवारी (ता.10) मांडव सजला होता. ज्या घरात मंगलकार्य व्हायचंय त्यांच्याकडे सकाळपासूनच पाहुण्यांची वर्दळ सुरु झाली होती. कलवर्या, वरमाया नटुनथटून मिरवत होत्या. घराच्या एका बाजूला आचार्यांकडून भोजनाची तयारी सुरु असल्याने परिसरात सुगंधही दरवळत होता. उपस्थित सर्वजण आनंदात लग्नघटीकेची प्रतिक्षा करीत असतानाच अचानक घारगाव पोलिसांसह प्रशासनाचा मोठा लवाजामा विवाहस्थळी हजर झाला. निमंत्रण दिलेले नसतानाही समोर उभ्या ठाकलेल्या शासकीय पाहुण्यांना पाहताच वधु आणि वराच्या कुटुंबियांना घाम फूटला. आता यांना काय सांगावे आणि कोणी सांगावे अशी स्थिती असतानाच मुलीच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या पथकासमोर येवून सारवासारव करण्यास सुरुवात केली.
यावेळी त्यांनी हा विवाह सोहळा नसून केवळ सुपारीचा कार्यक्रम असल्याची बतावणी केली. प्रशासनाचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत अशी मेख मारताना त्यांनी प्रशासनाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत मुलीच्या जन्माचा दाखला सादर करण्यास सांगितले. त्यामुळे सगळं बिंग फुटण्याची स्थिती निर्माण झाल्याने दाखला सादर करण्यास टाळाटाळ सुरु झाली. मात्र पोलिसांनी खाकीचा आणि कायद्याचा धाक दाखवताच मुलीच्या आईने वधुचा जन्मदाखला सादर केला. त्यातून सदरची मुलगी 16 वर्ष 11 महिन्यांची आणि तिचा होणारा पती तिच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 35 वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाले.
हा सगळा प्रकार बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकालाही धक्का देणारा होता. त्यातून सावरत पथकाने बालविवाहाचे दुष्परिणाम, मातामृत्यूचे आणि जन्माला येणार्या अपत्यांमध्ये कुषोणाचे प्रमाण आदींबाबत माहिती देत दोन्ही पक्षांना लेखी हमीपत्र देण्यास सांगितले. त्यात मुलीचे कायदेशीर वय पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही स्थितीत तिचा विवाह करणार नसल्याचे अभिवचन घेण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्हीकडच्या नातेवाईकांसह उपस्थितांशी बोलताना पोलीस निरीक्षक पुजारी यांनी या उपरांतही विवाह लावण्याचा प्रयत्न केल्यास लग्न लावणारे, तयारी करणारे, सहभागी झालेले, नातेवाईक, भटजी, आचारी, वाजंत्री अशा सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आणि पथकाने अल्पवयीन मुलीच्या विवाहासाठी उभारलेला मांडव सोडला.
वास्तविक गुरुवारी (ता.10) अवघ्या 17 वर्षीय मुलीचा तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या अधेडाशी विवाह निश्चित होता. मात्र कोणीतरी अज्ञात इसमाने याबाबत अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ कक्षासह पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन त्याची माहिती दिली. त्यानुसार घारगाव पोलीस, स्नेहालयाच्या उडानचे कार्यकर्ते आणि पंचायत समितीच्या बालविवाह विरोधी समितीचे अधिकारी यांनी तत्काळ कारवाई करीत एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखले. या प्रकारातून तालुक्यात आजही बालविवाह उरकण्याची मानसिकता शिल्लक असल्याचे दिसून आले असून त्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज अधोरेखीत झाली आहे.
बालविवाहानंतर गर्भाधारणा होवून त्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने सरकारने 2006 साली बालविवाह प्रतिबंधक कायदा आणला. त्यात दोन्हीकडच्या नातेवाईकांसह अशा सोहळ्यांसाठी सहकार्य करणार्या प्रत्येक घटकाला दोषी धरुन मुलीचे वय 17 वर्षांपेक्षा कमी असल्यास दोन वर्ष सश्रम कारावासासह एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतुदही केली. मात्र हा कायदा अस्तित्वात येवून दोन दशकांचा काळ उलटूनही राज्यातील काही भागात बालविवाहाची परपंरा खोलवर रुजलेली असल्याचे बघायला मिळते. त्यात आता संगमनेर तालुक्याच्या पठारभागाचाही समावेश झाला आहे.