संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन! सहा गटात होणार स्पर्धा; राज्याच्या संघात जाण्याचीही संधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा योगासन स्पेार्ट असोसिएशनच्यावतीने येत्या 15 व 16 जुलै रोजी संगमनेरात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुला-मुलींच्या सहा गटात आणि योगासनांच्या चार प्रकारात होणार्या या स्पर्धेतून राज्याच्या पातळीवर जाण्याची संधीही स्पर्धकांना मिळणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुकास्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया व नॅशनल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील योगासनांचा समावेश करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी करताना पदकांची लयलुट केली. स्पर्धकांच्या सातत्यपूर्ण यशाने मनोबल उंचावलेल्या राज्य योगासन संघटनेने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली असून त्या माध्यमांतून योगासनांमधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे.

पुढील आठवड्यात शनिवार 15 व रविवार 16 जुलै रोजी संगमनेरात ही स्पर्धा होणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात होणार्या यास्पर्धेत 9 ते 14 वयासाठी सब-जुनिअर, 14 ते 18 वयासाठी ज्युनिअर, 18 ते 28 सिनिअर, 28 ते 35 वयासाठी सिनिअर (अ), 35 ते 45 वयासाठी सिनिअर (ब), 45 ते 55 वयासाठी सिनिअर (क) अशा 6 गटात विभागणी केली गेली आहे. त्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतचे वय गृहीत धरले जाणार आहे. पारंपरिक एकल, कलात्मक एकल व दुहेरी तसेच तालात्मक दुहेरी या योगासनांच्या चार प्रकारात ही स्पर्धा होणार असून स्पर्धकांना दोन स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल.

स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्या योगासन खेळाडूंनी 13 जुलैपूर्वी ऑनलाईन नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऐनवेळी अथवा मुदतीत नोंदणी न करणार्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. स्पर्धेत विजयी होणार्या खेळाडूंचा संघ राज्यपातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर, राज्य पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवण्याचीही संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. मालपाणी लॉन्स कॉलेज रोड, संगमनेर येथे होणार्या या स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेश झोटिंग (9823138856) व कुलदीप कागडे (9527320109) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
